परवानाधारक एजन्सीकडून अनधिकृत होर्डिंग; फौजदारी गुन्हा दाखल करून महापालिका सुस्त

परवानाधारक एजन्सीकडून अनधिकृत होर्डिंग; फौजदारी गुन्हा दाखल करून महापालिका सुस्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून परवाना घेतलेल्या अधिकृत एजन्सीकडूनच शहरात अनधिकृत जाहिरात होर्डिंग उभारले जात आहेत. ही बाब महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. अनधिकृत होर्डिंग उभे करून लाखोंचे उत्पन्न मिळविणार्‍या या एजन्सीवर महापालिकेने केवळ फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. त्या एजन्सीवर कठोर कारवाई करून काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. घाटकोपर, मुंबई येथे मे महिन्यात 13 तारखेला 250 टन वजनाचे जाहिरात होर्डिंग कोसळून 17 जणांचा बळी गेला. तर, अनेक जण जखमी झाले. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनधिकृत, नियमबाह्य आणि धोकादायक जाहिरात होर्डिंगचे सर्वेक्षण केले. त्यात तब्बल 24 जाहिरात होर्डिंग अनधिकृत असल्याचे उघड झाले. तर, तब्बल 372 होर्डिंग वाढीव आकाराचे आणि अधिक उंचीचे असल्याचे आढळून आले आहेत.

अनधिकृत होर्डिंग उभारण्यात परवानाधारक जाहिरात एजन्सीदेखील मागे नाहीत. या सर्व अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. काही होर्डिंग महापालिकेने पाडले तर, काही होर्डिंग एजन्सीने स्वत: काढून घेतले. त्या एजन्सी, होर्डिंगधारक, होर्डिंगचालक व जागामालकांवर महापालिकेने पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिस तपासानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते किंवा ते कायद्याचा आधार घेऊन निर्दोष ठरू शकतात. शेकडो टन वजनाचे होर्डिंग कोसळून नागरिकांचा नाहक जीव जात आहे. तसेच, वित्तहानी होत आहे. मात्र, परवानाधारक होर्डिंग एजन्सींकडून अनधिकृतपणे होर्डिंग लावून जाहिरातीचा 'धंदा' केला जात आहे.

महापालिका त्यांच्यावर फुटकळ कारवाई करते. पोलिसांत तक्रार दाखल करून समाधान मानत आहे. त्यात त्या परवानाधारक एजन्सीवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. नियमभंग करून नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या अशा एजन्सीवर कठोर कारवाई करीत, त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी होत आहे. तसेच, आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या परवाना निरीक्षकांवरही कारवाई होणे अपेक्षित आहे. त्याबाबत आयुक्तांनी केवळ कागदी आदेश देऊन गप्प न बसता, ठोस कारवाईची अपेक्षा केली जात आहे.

अनधिकृत होर्डिंग लावणारे…

आनंद पब्लिसिटी, शिवशंकर अ‍ॅडर्व्हटायझिंग, शुभांगी अ‍ॅडर्व्हटाझिंग, झरेकर एजन्सी, गणेश एंटरप्रायजेस, यशोधन पब्लिसिटी, जी. के. बिल्डर्स, जे. के. बिल्डर्स, व्ही. अपटाऊन, सुखवानी अरतुज, वाघेरे प्रमोटर्स, म्हाडा, हॉटेल कामत, बालाजी फर्निचर, धनंजय विठ्ठल काळभोर, स्पाईन सिटी, कॅस्टल गेट, प्रताप बारणे, हर्षवर्धन भोईर आदी.

होर्डिंगवर कारवाई सुरूच

शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग हटविण्यात आले आहेत. होर्डिंगधारक, होर्डिंगचालक, जागामालक यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. वाढीव आकार तसेच, अधिक उंचीवर असलेल्या परवानाधारक होर्डिंगला नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील अनेकांनी नियमानुसार होर्डिंगचा आकार करून घेतला आहे. तसेच, हाऊसिंग सोसायटीच्या इमारतींच्या गच्चीवरील अनधिकृत होर्डिंगवरही कारवाई करण्यात येत आहे. अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर महापालिका सक्तीने कारवाई करीत आहे, असे महापालिकेचे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news