

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यटनावरही पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील किमान पाच लाखांहून अधिक पर्यटकांनी आंतरराष्ट्रीय पर्यटनापेक्षा देशांतर्गत पर्यटनावर भर दिलेला दिसून येत आहे.
युद्धामुळे लंडन आणि युरोप येथील व्हिसा मिळण्यासाठी जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांनाच या काळात व्हिसा दिला जात आहे.
मात्र, इतरांना युरोप आणि लंडन येथे जाणे कठीण झाले आहे. जाचक अटी आणि युद्धजन्य परिस्थितीची भिती या सर्वांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनासाठी पर्यटकांनी दरवर्षीची पर्यटनस्थळे बदली आहेत.
पासपोर्ट कार्यालयातून दुबई आणि मालदीव येथील व्हिसा तत्काळ दिला जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनासाठी या ठिकाणांना पर्यटक भेटी देत आहेत.
दर आठवड्याला पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची या ठिकाणांना भेटीची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनासाठी किमान एक महिना अगोदर पूर्व तयारी करावी लागते.
सोबतच युद्धजन्य काळात सुरक्षेच्यादृष्टीने काही पर्यटकांचा कल देशातंर्गत पर्यटनाकडे वळालेला दिसून येतो. आता उन्हाचा पारा वाढल्याने शहरातील पर्यटकांची ओढ अधिक तर हिल स्टेशनकडे आहे.
त्यामुळे देशात सेवन सिस्टर म्हणून ओळखल्या जाणार्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपुर, मिजोरम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांना नागरिकांची अधिक पसंती आहे. त्यासोबतच राज्यातील लोणावळा, खंडाळा, कोकण, महाबळेश्वर, माथेरान या ठिकाणांना भेटी दिल्या जात आहेत.
कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांनी अनेक समस्यांना तोंड दिले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यासोबतच देशांतर्गत पर्यटनात लसीकरणाची शिथिलता करण्यात आली आहे. त्यामुळे देशातंर्गत पर्यटनाला वाव मिळत आहे.
युद्धजन्य परिस्थितीपूर्वी या महिन्यात युरोप लंडनसाठी नागरिकांची पासपोर्ट व्हिसासाठी तयारी सुरू होत असे, एप्रिल व मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात नागरिकांची युरोपला टूर होत होती. मात्र, आता या देशांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई आणि मालदिव देशातंर्गत सेवन सिस्टर- अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिजोरम, नागालँड आणि त्रिपुरा तर राज्यातील लोणावळा, खंडाळा, कोकण, महाबळेश्वर, माथेरान.
युद्धजन्य परिस्थितीच्या भितीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी पर्यटक आणि टूरिस्ट कंपन्या दोघांचीही मानसिकता होत नसल्याची दिसून येत आहे. कोरोना काळातील भयावह परिस्थितीमधून बाहेर पडून, सुरक्षा आणि तणाव मुक्त संचार करण्यासाठी देशांतर्गत पर्यटनावर पर्यटकांचा अधिक भर आहे.
पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी वापरले जाणारे अंतर्गत रस्ते व महामार्गांची सोय शासनाने उत्तमरित्या केली आहे. त्यामुळे मनाली-लेह सारख्या ठिकाणांना भेटी वाढल्या आहेत. तिसर्या लाटेच्या भितीने नागरिक ग्रस्त होते. मात्र भीती आता दुर झाल्याने नागरिकांची पर्यटनाला अधिक पसंती वाढली आहे.
– प्रितम शिंदे, व्हिजन हॉलिडे, निगडी.