

इंदापूर : उजनी धरण परिसरातील गाळपेरीच्या जमिनींना कोणत्याही परिस्थितीत हात लावू नये, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच फ्लोटिंग सोलर पॉवर प्रकल्पाबाबत पुढील निर्णय होईल आदी काही महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याने उजनी धरणग््रास्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उजनी धरण परिसरातील गाळपेरी जमिनी, शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसा आणि प्रस्तावित प्रकल्पांमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णायक निर्णय घेण्यात आल्याने संबंधित तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सदाभाऊ खोत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपनेते प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने, शेतकरी संघटनेचे नीलेश देवकर, कोयना पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत इंदापूर, दौंड, कर्जत, माढा आणि करमाळा या तालुक्यांतील अनेक शेतकरी प्रत्यक्षात आपल्या जमिनीची वहिवाट करतात. त्यांना जलसंपदा विभागाकडून नोटिसा पाठविल्याने संभमाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर मंत्री विखे पाटील यांनी संबंधित कारवाईला तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला.
गाळपेरीच्या जमिनींना कोणत्याही परिस्थितीत हात लावू नये, ज्यांची जमीन अधिग््राहित झाली आहे किंवा जे धरणग््रास्त आहेत त्यांनाच 11 महिन्यांच्या कराराने वहिवाटीसाठी जमीन द्यावी आणि याबाबत पूर्वीच्या जीआरनुसार अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.
उजनी धरणालगत प्रस्तावित फ्लोटिंग सोलर पॉवर प्रकल्पाबाबत माहिती सर्वांना देण्यात येईल. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय धरणालगत सुमारे साडेतीनशे हेक्टर पर्यटन प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन आहे. या क्षेत्रात काही शेतकरी सध्या शेती करीत आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याचे ठरले आहे.
दरम्यान, पाटबंधारे वसाहतीचा प्रश्न सोडविण्यासाठी ती संबंधित ग््राामपंचायतीकडे वर्ग करणे किंवा स्वतंत्र महसुली सजा करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, धरणग््रास्तांना दिलासा देताना संबंधित सर्व विभागांत समन्वय ठेवण्याच्याही सूचना विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीत कळीचे प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांच्या संघटित लढ्याला हे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. त्यांच्या हक्कांच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला जाईल. आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे म्हणत भाजपनेते प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांनी उजनी प्रश्नावर भाजप व मित्रपक्ष शेतकऱ्यांच्या ठाम पाठीशी उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला.