धक्कादायक ! पुण्यातील एआरएआय टेकडीवर दोन तरुणी ड्रगधुंद अवस्थेत

धक्कादायक ! पुण्यातील एआरएआय टेकडीवर दोन तरुणी ड्रगधुंद अवस्थेत
Published on
Updated on

पुणे/ पौडरोड : पुढारी वृतसेवा : पुणे हे शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असल्याने नामांकित विद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील अनेक विद्यार्थी विद्यापीठात येतात. मात्र घरापासून लांब असलेले तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जात आहे. पौड रोडवरील एआरएआय टेकडीवर शनिवारी सायंकाळी दोन तरुणी नशेत टुल्ल असलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी (पिट्याभाई) हे सायंकाळी वॉकिंगला गेले असता हा प्रकार समोर आला.

सामाजिक माध्यमातून हा विषय उचलून धरत त्यांनी नशेच्या आहारी जाऊ नका, असे आवाहन तरुण-तरुणींना केले आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 3600 कोटींच्या मेफेड्रॉन तस्करीचा पर्दापाश केल्यानंतरही नशेत टुल्ल झालेल्या तरूणी आढळल्या आहेत. शहरभर अमली तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असतानाही अजूनही ड्रग्ज माफियांकडून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. अभिनेते रमेश परदेशी यांनी नशेत बेधुंद असलेल्या तरुणींचा व्हिडीओ रेकॉर्ड करून पालकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

कोथरूड परिसरातील वेताळ टेकडीवर दोन मुली दारू आणि ड्रग्जच्या नशेत धुंद असलेल्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधील दिसणार्‍या मुलींमध्ये एक झोपलेल्या अवस्थेत होती तर दुसर्‍या मुलीची शुद्ध हरपल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, अभिनेते परदेशी यांच्यासह टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी मुलींच्या चेहर्‍यावर पाणी ओतून त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संंबंधित मुलींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिक्षण घेण्यास आलेले हे राज्यातील व परराज्यातील विद्यार्थी वेगवेगळी व्यसने करत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. तरुण पिढी गांजा, चरस, गर्द पावडर, हेरॉईन, ब्राऊन शुगर आदी मादक पदार्थांच्या व्यसनात गुरफटत आहे. गांजा, निकोटिन, व मद्य सेवनाचे तरुणाईतील प्रमाण वाढत आहे. शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे नशा करताना निदर्शनात येत आहेत. आजकाल काही कॅफेमध्ये युवतीदेखील सर्रास सिगारेट, हुक्का ओढतांना दिसतात. कोणी तणावामुळे तर कोणी मौजमजेच्या नावाखाली व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. सध्याची तरूणाई व्यसनाधीनतेकडे वळत असून, ही गंभीर बाब आहे.

पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. व्यसन सोडण्यासाठी पालकांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. व्यसन करणार्‍या तरूणांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. या परिसरात लहान-मोठे हॉटेल व्यावसायिक हॉटेल्स रात्री उशिरापर्यत चालू ठेवतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी रात्रभर भटकंती करत असतात. त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवले पाहीजे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

शहरात मोठ्या प्रमाणात ड्रॅग सापडले आहेत. या पूर्वी किती प्रमाणात ड्रॅग्जची डिलिव्हरी झाली असेल याची कल्पना नाही. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवं.

-रमेश परदेशी, अभिनेते

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news