पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्करी प्रकरणातील ललित पाटील याचे साथीदार असलेल्या इमरान शेख उर्फ अतिक अमीर खान व हरिश्चंद्र पंत याला पुणे पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटद्वारे अटक केली. मुंबई येथून अटक केल्यानंतर दोघांसह सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या त्यांच्या अन्य आठ साथीदारांना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी, न्यायालयाने सर्वांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ड्रग तस्करी प्रकरणात आणखी चार सदस्यांची नावे निष्पन्न झाली आहेत.
संबंधित बातम्या :
यांमधील शेख उर्फ खान यास कुर्ला ईस्ट, तर पंत यास भोईसर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. पंत याने शिंदे गाव एमआयडीसी नाशिक येथे सुरू केलेल्या कारखान्यामध्ये ललित पाटील आणि अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून फॅक्टरीमध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर शेख उर्फ खान याला आरोपींनी नाशिक येथे उत्पादित केलेल्या मेफेड्रोनची मुंबई येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंदकुमार लोहारे आणि प्रज्ञा कांबळे यांना येरवडा कारागृहातून तसेच रेहान उर्फ गोलू याला तळेजा कारागृह, जिशान इकबाल शेख याला आर्थर कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे पुन्हा ताब्यात घेतले. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. युक्तिवादादरम्यान सरकारी वकील चंद्रकिरण साळवी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.
पुण्यात सुरू करायचा होता ड्रगचा कारखाना
ललित प्रकरणातील आरोपींना नाशिकप्रमाणे पुण्यातही ड्रगनिर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता. मात्र, ड्रग रॅकेट समोर आल्यानंतर त्यांचा डाव फसल्याची माहिती वकिलांनी न्यायालयाला दिली.
प्रज्ञा कांबळेचा जामीन फेटाळला
ड्रग विक्रीतील कांबळे हिने वेळोवेळी ललित पाटील, अभिषेक बलकवडे आणि भूषण पाटील यांनी तिला उदरनिर्वाहासाठी तसेच चारचाकी, मोबाईल घेण्यासाठी कॅश आणि अकाउंटवर पैसे दिले होते. आरोपी भूषण पाटील याच्या मोबाईलमध्ये जिशान शेख व प्रज्ञा कांबळे या दोघांचे एमडी फॅक्टरी व इतर बाबींवरील संभाषण पोलिसांना प्राप्त झाले आहे. मोक्काअंतर्गत प्रज्ञा कांबळे हिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.