बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील ३१ पैकी २ ग्रामपंचायतींवर भाजपने सरशी केली आहे. पारवडी व चांदगुडेवाडी येथे भाजपचे सरपंच झाले आहेत. अन्य ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी (दि. ६) येथील प्रशासकीय भवनामध्ये पार पडली. या निवडणूकीत भाजपने तालुक्यात चांगलीच एन्ट्री केली. यामध्ये भाजप नेते बाळासाहेब गावडे यांच्या ताब्यातील पारवडी ग्रामपंचायत त्यांच्याकडे पुन्हा राहिली. सरपंचपदासह गावडे यांच्या पॅनेलने नऊ जागी विजय मिळविला. चांदगुडेवाडीत भाजप नेते दिलीप खैरे यांच्या नेतृत्वात सरपंचपद भाजपकडे गेले, चार जागा भाजपने मिळविल्या.