

लोणावळा: लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा धरणाच्या जलाशयामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि. 8) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
मोहम्मद जमाल (22, रा. रमजान अली, विजापूर, उत्तरप्रदेश) व साहिल असरफ अली शेख (19, रा. पीसीएमसी यशवंतराव चव्हाण हिंदी शाळा, थेरगाव, पुणे) अशी धरणात बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. (Latest Pune News)
शहरामध्ये अद्याप मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नसल्यामुळे भुशी धरण हे भरलेले नाही. असे असले तरी धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. रविवारी सकाळपासून भुशी धरण व धरणाच्या पायर्यांवर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यातच काही तरुण व हौशी पर्यटक हे धरणाच्या मागील बाजूस डोंगर भागाकडे गेले होते. डोंगर भागाकडून धरणाच्या जलाशयात
पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.बॅक वॉटरमध्ये दोन तरुण बुडाले असल्याची माहिती दुपारच्या सुमारास समजतात लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप व पोलिस कर्मचारी यांची टीम तसेच शिवदुर्ग रेस्क्यू पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने पाणबुडीच्या सहाय्याने ज्या ठिकाणी तरुण बुडाले, तेथे शोध घेत दोघांचे मृतदेह दुपारी चार ते सव्वाचारच्या दरम्यान पाण्यातून बाहेर काढले. शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील महेश मसणे, सचिन गायकवाड, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू, हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, श्याम वाल्मीक, महादेव भवर, राजेंद्र कडू, अनिल आंद्रे यांनी रेस्क्यू पूर्ण केले.
पर्यटकांचा अतिउत्साह ठरतोय जीवघेणा
लोणावळा व मावळ तालुका हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामध्ये पर्यटनासाठी येतात; मात्र काही तरुण व हौशी पर्यटकांचा अति उत्साह हा जीवघेणा ठरतो. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या नावलौकिकालादेखील गालबोट लागत आहे. मागील वर्षेदेखील याच धरणाच्या दुसर्या बाजूकडील एका धबधब्यामध्ये अशाच प्रकारे जीवघेणा प्रकार करताना काही पर्यटक वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.