

पुणे: उन्हाळी भुईमूग शेंगांचा हंगाम सुरू झाल्याने राज्याच्या विविध भागातून भुईमुगाच्या शेंगा गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात दाखल होऊ लागल्या आहेत. पावसाच्या उघडीपीनंतर शेतकर्याकडून मोठ्या प्रमाणात शेंगांची काढणी करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत.
पावसाळी वातावरणामुळे शेंगाला मागणीही चांगली आहे. मात्र, बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. (Latest Pune News)
मुंबईतील मार्केटला जाणार्या गाड्या पुण्यातील बाजारपेठेकडे वळाल्याने रविवारी बाजारात हिरवी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. राज्यासह परराज्यातून आवक झाल्याने हिरव्या मिरचीच्या दरात दहा टक्क्यांनी घसरण झाली.
याखेरीज, राज्यासह हिमाचल प्रदेश व कर्नाटक येथून घेवड्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने घेवड्याचे भाव उतरले आहेत. राज्यासह देशात सर्वदूर पाऊसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका टोमॅटो, वांगी व मटारच्या उत्पादनाला बसला आहे. पावसामुळे या फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने टोमॅटो, वांगी व मटारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी बाजारात 90 ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. गत आठवड्याच्या तुलनेत आवकमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित अन्य सर्व फळभाज्यांची आवक- जावक कायम राहिल्याने दिर टिकून होते.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक येथून टोमॅटो 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 15 ते 20 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, मध्यप्रदेश येथून गाजर 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश 3 ते 4 टेम्पो मटार, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 2 ते 3 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे 8 ते 10 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 40 ते 45 टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 550 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार पेटी, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 5 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंग 100 ते 125 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 50 ते 60 टेम्पो इतकी आवक झाली.
पालेभाज्यांकडे खरेदीदारांची पाठ
पाऊसामुळे नुकसान झाल्याने मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक सलग दुसर्या आठवड्यात कमी झाली आहे. मात्र, दर्जाहिन आणि भिजलेला माल आणि वाढलेल्या भावामुळे नागरिकांनी पालेभाज्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात करडई, मुळे, कांदापातच्या भावात जुडीमागे प्रत्येकी 5 रुपये, तर अंबाडी, चुका आणि पुदीनाच्या भावात 4 रुपयांनी घट झाली आहे.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 8) कोथिंबिरीची सुमारे 75 हजार जुडी तर मेथीची 20 हजार जुडींची आवक झाली होती. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. नेहमीच्या तुलनेत जवळपास निम्मीच आहे. पुढील काही दिवस आवक कमी राहण्याचा अंदाज व्यापार्यांकडून वर्तविण्यात येत आहे.