

Tukobaraya Palkhi 2025
खोर : लागोनिया पाया विनवितो तुम्हाला,
कर टाळी, बोला मुखी नाम!
'विठ्ठल! विठ्ठल!' म्हणा वेळोवेळी,
हा सुखसोहळा नाही स्वर्गीही!
जगदगुरु श्री संत शिरोमणी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने आपल्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत मंगळवार दिनांक २४ जून रोजी वरवंड (ता.दौंड) गावात ऊन सावलीचा खेळ खेळत मंगलमय वातावरणात सायंकाळी ठीक ६ वाजून २० मिनिटांनी दिमाखदार आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात, "ज्ञानोबा माऊली तुकाराम" च्या जयघोषाच्या वातावरणात भक्तिभावाची उधळण झाली. या पवित्र प्रसंगी संपूर्ण वरवंड नगरीने भक्तीमय रंगधागांत नटून थटून सोज्वळ आत्म्याचे दर्शन घडवले.
वरवंड गावाच्या वेशीवर पालखी सोहळा व वैष्णवांचा मेळा येताच गावकरी भाविकांच्या उपस्थितीत सरपंच योगिता दिवेकर आणि उपसरपंच बाळासाहेब जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. फुलांच्या पुष्पवृष्टीने आणि फटाक्यांच्या आताषबाजीत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
पालखीने यवत मुक्काम पूर्ण करून भांडगाव येथे न्याहारी आणि विश्रांतीसाठी थांबा घेतला होता. त्यानंतर चौफुला येथे दुपारच्या मुक्कामासाठी पालखी थांबवण्यात आली. दौंड तालुक्यातील या मध्यवर्ती ठिकाणी विविध गावांतून आलेल्या भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले. दरम्यान न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे ‘वारी ते बारी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले. पुणे - सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी सामाजिक संस्था, हॉटेल व्यावसायिक दार यांच्या वतीने नाश्त्याची सोय केली होती.
सायंकाळी पालखी सोहळा वरवंड मुक्कामी पोहचताच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरतीचा भव्य सोहळा पार पडला. यामध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी सहभागी होऊन श्रींच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली होती. आरामदायी मुक्कामासाठी जर्मन तंबू उभारण्यात आले असून भोजन व्यवस्थाही घरोघरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. गावकऱ्यांनी आपली सेवा हीच श्रींची सेवा समजून प्रेमाने भोजन आणि निवासाची व्यवस्था केली.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने संपूर्ण वरवंड गाव भक्तिरसात न्हाऊन गेले असून या दिवशीचे क्षण गावकऱ्यांच्या व वारकऱ्यांच्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहेत. वारीतील या टप्प्याने वारकऱ्यांच्या पावलांना थोडी विश्रांती दिली असली तरी त्यांच्या भक्तीचा उत्साह अधिकच बळावला आहे. गावातील रस्ते फुलांनी सजवले गेले होते, भगव्या पताकांनी आकाश भक्तीच्या रंगांनी भरून गेला होता. गावकरी, महिला-पुरुष, लहानथोर सर्वांनी एकसंध होऊन विठुरायाच्या या दूतांचे सस्नेह स्वागत केले.
भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रांगा लावल्या होत्या. यावेळी गावाला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी वरवंड गावाच्या चौकात पालखीच्या स्वागतासाठी श्री भैरवनाथ विद्यालय खुटबाव यांच्या वतीने भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
वरवंड ग्रामपंचायत यांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी अंघोळीसाठी ३०० शॉवर बसविण्यात आले. वारकऱ्यांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम उभारण्यात आली. १२०० फिरते शौचालय युनिट उभारण्यात आले आहे. पालखी तळावर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. साचपाण्यामुळे डासांचा त्रास होणार नाही म्हणून गावात औषध फवारणी करण्यात आली आहे. जागोजागी सावलीसाठी मंडप, स्पीकर व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून आरोग्याच्या सुख सुविधा जागोजागी पुरविण्यात आल्या आहेत. गावातील अनेक महत्वाच्या ठिकाणी प्रशासन विभागाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, वरवंड ग्राम शिक्षण संस्था, नागनाथ माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने देखील वारकऱ्यांची उत्तम प्रकारे जोपासना करण्यात आली.