
Wardha to Pandharpur Buses
वर्धा : श्री. क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रेनिमित्त जाणार्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. वर्धा विभागातून ७५ बसेस सोडण्यात येणार आहेत.
वर्धा, आर्वी, हिंगणघाट आगारातून प्रत्येकी २० बसेस, तळेगाव ६ व पुलगाव आगारातून ९ अशा ७५ जादा बसेस सोडण्यात येणार आहे. वर्धा ते पंढरपूर करीता पूर्ण तिकीट १ हजार ५१ रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी ५२६ रुपये आहे. आर्वी ते पंढरपूर पूर्ण तिकीट १ हजार ५१ रुपये, तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी ५२६ रुपये, हिंगणघाट ते आजनसरा पंढरपूर पूर्ण तिकीट १ हजार २०२ रुपये, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ६२१ रुपये, हिंगणघाट ते पंढरपूर पूर्ण तिकीट १ हजार १६२ रुपये, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ५८१ रुपये, तळेगाव ते पंढरपूर पूर्ण तिकीट १ हजार ४१ रुपये, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ५२१ रुपये व पुलगाव ते पंढरपूर पूर्ण तिकीट १ हजार ३१ रुपये, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ५१६रुपये आकारण्यात येणार आहे.
गावकरी समूह, वारकरी समूह, भजनी मंडळ व मंदिर समिती यासारख्या समुहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी, याकरीता सर्वच बसस्थानकावरुन बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. राज्य परिवहनच्या सर्व सवलती यामध्ये ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजनेंतर्गत देय असलेल्या तिकिट दरात सवलत देण्यात येणार आहे.
तरी भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्यासाठी संबंधित आगार प्रमुखाशी संपर्क साधावा. या बससेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.