

पुणे: राज्य प्रशासनात पुन्हा एकदा धडाकेबाज शैलीची एन्ट्री झाली असून, कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची जबाबदारी सोपविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे प्रशासनात ‘मुंढे पॅटर्न’ पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यातील अन्न सुरक्षा, बनावट औषधे, अनधिकृत उत्पादन आणि आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी नागपूर महापालिका, परिवहन विभाग तसेच विविध प्रशासकीय पदांवर काम करताना कठोर निर्णय आणि पारदर्शक कारभारामुळे वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कारकीर्दीत वारंवार बदल्या झाल्या असल्या तरी ‘नो-नॉन्सेन्स ऑफिसर’ अशी त्यांची प्रतिमा कायम राहिली आहे.
दरम्यान, माजी वरिष्ठ अधिकारी महेश झगडे यांच्या कार्यशैलीशी मुंढे यांच्या भूमिकेची तुलना होत आहे. नियमांची कठोर अंमलबजावणी, भष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिका आणि प्रशासनात शिस्त निर्माण करण्यासाठी झगडे ओळखले जात होते. आता ‘एफडीए’मध्ये मुंढे यांची नियुक्ती झाल्याने औषध माफिया, बनावट अन्न उत्पादन आणि अनियमित व्यवहारांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय वर्तुळात या नियुक्तीकडे केवळ प्रशासकीय बदल म्हणून नव्हे, तर सरकारच्या ‘कडक प्रशासन’ संदेशाच्या रुपात पाहिले जात आहे. आगामी काळात ‘एफडीए’ विभागात मोठे निर्णय आणि धाडसी मोहिमा दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.