

खडकवासला : पानशेतजवळील निगडे मोसे गावातील आदिवासी कातकरी समाजातील गर्भवती महिलेला जीवदान देण्यात जिल्हा परिषदेच्या पानशेतमधील प्राथमिक आरोग्य केंद्र व पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना यश आले आहे. अतिशय किचकट शस्त्रक्रिया करून या महिलेचे ससूनमध्ये बाळंतपण करण्यात आले. महिला व बाळही सुखरूप आहे. याठिकाणी जणू माणुसकीचे दर्शन घडले आहे. कागदपत्रे नसतानाही आदिवासी समाजातील महिलेला डॉक्टरांचा आधार मिळाला आहे.(Latest Pune News)
महिला व तिच्या पतीने आधारकार्ड काढले नसल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू आहे. आधारकार्ड नसल्याने महिलेवर औषधपचार करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे असले तरी सर्व नियम बाजूला ठेवून बाळंत महिला व नवजात बालकावर वेळेवर उपचार केले जात आहेत. सध्या या महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे सिंहगड, पानशेत, राजगड भागातील निम्म्याहून अधिक आदिवासी कातकरी समाज बांधवांना अद्यापही आधारकार्ड मिळाले नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
नीलिमा बाळू कोळी (वय 27) असे या महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि. 6) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नीलिमा हिच्या पोटात कळा येऊ लागल्या. त्याची माहिती मिळताच, अर्धा तासात निगडे मोसे येथील आशासेविका अर्चना उल्हास नलावडे या सरकारी रुग्णवाहिकेसह सकाळी साडेसात वाजता निगडे मोसेतील आदिवासी कातकरी वाड्यात दाखल झाल्या.
नीलिमा हिला सरकारी रुग्णवाहिकेतून सकाळी आठ वाजता पानशेतमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी व पारिचारिका पूनम कांबळे यांनी तिची तपासणी केली. मात्र, नीलिमा हिची प्रकृती चिंताजनक बनत असल्याने तेथून तिला त्याच रुग्णवाहिकेतून खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथेही सुखरूप बाळंतपण होण्याची शक्यता नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे नीलिमा हिला रुग्णवाहिकेतून तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दुपारी बारा वाजता किचकट शस्त्रक्रिया करून तिचे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले.
नीलिमा व तिच्या पतीकडे आधारकार्ड नसल्याने तसेच तिचे दुसरे लग्न झाले असल्याने ससून प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे नीलिमा हिची आई सुलाबाई जाधव या घाबरून गेल्या. तिचा मोबाईल फोनही रविवारी (दि.9) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मेडिकल स्टोअर्सच्या जवळून अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. त्यामुळे सुलाबाई हिला कोणाशीही संपर्क साधता आला नाही. घाबरलेल्या अवस्थेत सुलाबाई दुपारी निगडे मोसे येथे आल्या. मावळा जवान संघटनेचे कार्याध्यक्ष रोहित नलावडे यांना तिने घडलेला प्रकार सांगितला. माझ्या लेकीकडे आधारकार्ड नसल्याने आमच्यावर पोलिस केस झाली आहे, असा आक्रोश सुलाबाई करत होत्या. रोहित यांनी याची माहिती पानशेत आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी यांना दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने ससून रुग्णालयात रांजणे उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे यांना पाठवले. डॉ. लोखंडे यांनी ससून रुग्णालयाकडून सर्व माहिती घेऊन नीलिमा व तिच्या बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली.
राजगड, सिंहगड भागात शासनाच्या वतीने आदिवासी कातकरी समाज बांधवांना आधारकार्ड, जातीचे दाखले, रेशनकार्ड व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी वेळोवेळी शिबिरे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत, असे असले तरी निम्म्याहून अधिक आदिवासी बांधव आधारकार्ड व इतर शासकीय दाखले, योजनांपासून वंचित असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. सर्वात भयानक स्थिती आदिवासी विद्यार्थ्यांची आहे. आधारकार्ड विनाच विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतात. मात्र, आधारकार्ड नसल्याने पुढे आठवीपासून शिक्षण घेत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या जवळपास साठ ते सत्तर टक्के आहे.
नीलिमा हिचे आधारकार्ड नसल्याने ससून प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली आहे. तिच्यावर नियमितपणे उपचार सुरू असून, तिच्या आई अथवा नातेवाईकांच्या आधारकार्डवर नीलिमा हिला सर्व उपचारानंतर घरी सोडण्यात येणार आहे.
डॉ. रूपाली लोखंडे, आरोग्य अधिकारी, रांजणे उपकेंद्र