शंकर कवडे
पुणे : पावसाच्या तडाख्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने भेंडी, गवार, काकडी, वांगी, गाजर, घेवडा आणि भुईमूग शेंगाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने हिरवी मिरची आणि मटारच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली.(Latest Pune News)
गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 9) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 85 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, इंदोर, राजस्थान, जयपूर येथून गाजर 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3-4 टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग 3 ते 4 टेम्पो, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथून मटार 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 2 ते 3 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 8 ते 10 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 50 ते 55 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500-550 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8-10 टेम्पो, भुईमूग शेंग 50-60 गोणी, गाजर 4 ते 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पावसाचा तडाखा त्यापाठोपाठ नव्या लागवडीवर थंडीचा परिणाम होत असल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक घटली आहे. रविवारी बाजारात कोथिंबिरीची एक लाख तर मेथीची 50 हजार जुडींची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 50 हजार जुडींनी घटली, तर मेथीची आवक स्थिर राहिली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला 15 ते 25 रुपये तर मेथीला 12 ते 18 रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात मेथीच्या एका गड्डीची 25 ते 30 रुपये तर मेथीची 15 ते 20 रुपयांना विक्री सुरू आहे.