

Tribal Community Agitation
नारायणगाव : आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या बद्दल जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी अपशब्द वापरल्याने आदिवासी समाजाचा अपमान झाल्याने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाच्या युवकांनी आ. सोनवणे यांच्या निवासस्थानासमोर रविवारी आंदोलन केले.
माफी मागा, माफी मागा शरद सोनवणे माफी मागा अशा यावेळी घोषणा देण्यात आल्या. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आ.शरद सोनवणे यांच्या रायगड बंगल्यासमोर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता.
आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून आ. शरद सोनवणे यांनी आदिवासी मंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली. त्यामुळे वातावरण निवळले.
जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी जुन्नर या ठिकाणी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बोलवलेल्या बैठकीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.
आदिवासी विकास मंत्री यांचा एकेरी शब्दप्रयोग करून त्यांना चोर संबोधल्याने आदिवासी तरुणांमध्ये तीव्र रोष होता. या युवकांनी आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्ते आमदार शरद सोनवणे यांच्या रायगड बंगल्यात घुसू नये म्हणून पोलिसांनी गेटचा दरवाजा लावून सगळे पोलीस कडे करून उभे होते.
सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना चोर संबोधल्याने आमच्या आदिवासी समाजाचा घोर अपमान झाला आहे त्यामुळे सोनवणे यांनी आदिवासी समाजाची आणि आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. या आंदोलनात आंबेगाव तालुक्यातील आदिवासी कार्यकर्ते अधिक संख्येने उपस्थित होते. यामध्ये अशोक गभाले, अरुण काठे, निलेश साबळे, प्रविण पारधी, योगेश चपटे, शिवाजी चौरे, अरुण केदार, सोमनाथ मुकणे, नामदेव साबळे आदींचा समावेश होता.
यावेळी आमदार शरद सोनवणे त्यांच्या घरात असलेल्या कार्यालयामधून बाहेर येऊन आंदोलन कर्त्यांना सामोरे गेले. यावेळी सुरुवातीला आमदार शरद सोनवणे व आदिवासी कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मला आदिवासी समाजाबद्दल मोठी आस्था आहे. त्यांच्या समस्या, त्यांचे दुःख मी जाणतो. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा नेहमी पुढाकार असतो. तथापि घोडेगाव येथे असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याकडून आदिवासी जनतेवर नेहमीच अन्याय होतोय या संदर्भामध्ये आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी दखल घेतली नाही. आपण जरी मंत्री असलो तरी जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर आपलं मंत्रिपद काय कामाचं? आणि म्हणून ह्या उद्रेकात माझ्याकडून मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले गेले, असे सोनवणे यांनी सांगितले.