मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार (दि. 26) निमित्त श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील एकमुखी व तीनमुखी श्रीदत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व टेंबे स्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली मंदिरात विविध कार्यक्रम पार पडले. पहाटे 3 ते 4 वाजता पांडवकालीन नारायणेश्वर (श्रीमहादेव मंदिर) तसेच श्रीदत्त मंदिरामध्ये दही, दूध, पंचामृताने अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर काकड आरती, धुपारती, पंचारती झाली. सकाळी साडेनऊ ते 10 पर्यंत आरती झाली. 10 ते दुपारी दीड वाजता भजनाचा कार्यक्रम झाला.
दुपारी 2 पर्यंत टेंबे स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले. या वेळी भाविकांनी गुरुदेव दत्तांचा जयघोष करीत पुष्पवृष्टी केली. अडीच वाजता आरती झाली. चारवाजेपर्यंत भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री 8 ते साडेआठपर्यंत आरती झाली. 10 वाजता दत्त महाराजांची पादुका पालखीत ठेवून मंदिर प्रदक्षिणा झाली. साडेदहा वाजता आरतीनंतर सांगता झाल्याचे दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांनी सांगितले.
मध्य प्रदेशचे माजी आमदार पांचीलाल मेढा (महेश्वर), पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, पंढरपूरचे सर्जेराव पवार, डॉ. उमेश डोंगरे, तात्यासाहेब भिंताडे, गंगाराम जगदाळे, पंडित साबळे, बबनराव टकले, एम. के. गायकवाड, सरपंच प्रदीप बोरकर, रामभाऊ बोरकर, बाळासाहेब डांगे, चंद्रकांत बोरकर, दादा भुजबळ, अजित बोरकर, तात्या बोरकर, सदानंद बोरकर, बाळासाहेब गायकवाड, दिगंबर भिंताडे आदी या वेळी उपस्थित होते.