भिगवण चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच! प्रवाशांना मोठा मनस्ताप

भिगवण चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच! प्रवाशांना मोठा मनस्ताप
Published on
Updated on

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : बारामती-भिगवण रस्त्याचे काँक्रिटीकरण करणार्‍या ठेकेदाराचा आडमुठेपणा कधी प्रवाशांच्या जिवावर बेतू लागला आहे, तर कधी अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. वाहतूक कोंडी तर नित्याचीच बनली आहे. त्यातूनच सोमवारी (दि. 11) मदनवाडी घाटात देवकातेवस्ती येथे तब्बल दोन तासांहून अधिक वेळ निर्माण झालेली वाहतूक कोंडी फुटली नाही. त्यामुळे अनेक वाहनचालकांना, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तर शटल बसमध्ये अडकून पडलेले शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह इतर प्रवाशांवर अंधारात तीन ते चार किलोमीटरची पायपीट करून भिगवण गाठण्याची वेळ आली.

आधीच बारामती-भिगवण शटल बसच्या अपुर्‍या व वेळी-अवेळी फेर्‍यांमुळे विद्यार्थी व प्रवासी त्रस्त झालेले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून बारामती-राशीन राज्यमार्गाच्या 26 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता चालल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे. मुरुमाऐवजी माती टाकणे, शेतकर्‍यांची अडवणूक करणे असे सर्रास प्रकार चालू आहेत. सध्या मदनवाडी (भिगवण चौक) भागात रस्त्याचे काम सुरू आहे. वास्तविक मूळ रस्त्याचे काम करताना पर्यायी रस्ता काढून देणे किंवा वाहतूक कोंडी निर्माण होऊ न देणे याची जबाबदारी ठेकेदारावर असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या भागात वाहतूक कोंडीने सर्वांच्याच नाकीनऊ आणले आहे. त्यात धुळीचे लोट, कधी रस्त्यावर पाणी टाकल्याने रस्ता निसरडा होऊन अपघात होणे असे प्रकार घडत आहेत. त्यातून गेल्या आठवड्यात एकाला आपला जीव गमवावा लागला.

सोमवारी तर बारामती-भिगवण शटल बस वेळेत न आल्याने दुपारी साडेतीन वाजलेपासून विद्यार्थी व प्रवासी बारामती बसथांब्यावर ताटकळत बसले होते. त्यानंतर कुठे सव्वासात वाजता बस भेटली. साधारण ही बस आठ- सव्वाआठ वाजेपर्यंत येणे अपेक्षित होते. परंतु मदनवाडी भागात एक ट्रॅक्टर नादुरुस्त झाला आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दीड-दोन तास कोंडी फुटत नसल्याचे पाहून अखेर बसमधील 20 हून अधिक मुली, वयोवृद्ध व इतर प्रवाशांनी खाली उतरून भिगवणची वाट धरली. चार ते पाच किलोमीटर अंधारातून पायपीट करून सव्वानऊ वाजता भिगवण गाठले. या वेळी या मुली प्रचंड भयभीत झाल्या होत्या, तर पालकांची चिंता वाढली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news