

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांना सकाळ-संध्याकाळ बंदी घाला, हा पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश अजून लाल फितीतच अडकल्याने पुणेकरांचे हाल अजूनही सुरूच आहेत. आता प्रशासनाला हलवण्याचे कामही अजित पवार यांनाच करावे लागेल का, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अनेक नेते आणि अधिकार्यांनी गेल्या काळात या रस्त्याचे पाहणी दौरे केले आहेत.
मात्र, रस्त्याच्या कामाला हवी तशी गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी 125 वार्डन व 25 वाहतूक पोलिस नेमण्याचा आदेश दिला होता. मात्र, याबाबतदेखील पुरेशी करण्यात आली नाही. विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांनीदेखील या मार्गावर सकाळी व संध्याकाळी अवजड वाहतूक बंदी करण्याचा दिलेला आदेश प्रशासनाच्या लाल फितीत अडकल्याचे चित्र दिसून येत आहे.
पथ विभागाने या रस्त्यावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांत टाकलेला मुरुम व साईडपट्ट्यांचे केलेल्या खडीवर डांबरीकरण करण्यास विलंब होत असल्याने धुळीमुळे वाहनचालक व नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार महापालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी साईडपट्ट्या करून रस्त्याची रुंदी वाढवण्याचा निर्णय झाल्यानंतरही काही ठिकाणी खडी टाकल्यावर त्यावर डांबर टाकण्याचा विसर प्रशासनाला पडलेला दिसून येत आहे. ब्लिंकर्स, दिशादर्शक फलक, झेब—ा क्रॉसिंग पट्टे, उतारावरील रम्बलर्स लावण्याचे काम पथ विभागांकडून काही ठिकाणी करण्यात आले. मात्र, अशा ठिकाणी डांबर न टाकल्याने दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक सकाळी व संध्याकाळी बंद करण्याबाबत उपाययोजना सुरू आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आला आहे. त्यांचा अभिप्राय मिळताच कार्यवाही केली जाईल.
-विजयकुमार मगर,
पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.या रस्त्याच्या साईडपट्ट्या वाढवून एक लाईन वापरात आणण्यासाठी खडीकरण केले. डांबर प्लांट विभागाला मागणी केली आहे. त्यानुसार डांबर उपलब्ध झाल्यानंतर एका आठवड्यात काम पूर्ण करण्यात येईल. वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
– धनंजय गायकवाड,
उपअभियंता, पथ विभाग, पालिकागेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील वाहतूक कोंडी, डांबरीकरण, रखडलेले रुंदीकरण समस्या आहेत. वाढती अवजड वाहतूक पाहता पथ विभागाने पावसाळ्यात मुरूम टाकलेल्या ठिकाणी व साईडपट्ट्यांवर डांबरीकरण करून वाहनचालक व नागरिकांना दिलासा द्यावा.
– तुषार कदम, रहिवासी, कात्रज
हेही वाचा