

खोर: श्रद्धा, निष्ठा, सहभोजन, मंगल गीते आणि एकत्र येण्याची ऊर्जा हे सारे आपल्या हिंदू संस्कृतीतील सणांचे आत्मिक सौंदर्य होते. पण आजच्या काळात हे सण केवळ आठवणींतच शिल्लक राहू लागले आहेत. पारंपरिक सणांची ओळख आणि त्यामागची सखोल सामाजिक व सांस्कृतिक मुळे हळूहळू विस्मरणात जात आहेत.
गणपती, गुढीपाडवा, होळी, दसरा, मंगळागौरी, नागपंचमी, दिवाळी, रक्षाबंधन, संक्रांती, दहीहंडी हे सण फक्त धार्मिक नव्हते, तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक होते. सडा-रांगोळी, झेंडूच्या फुलांच्या माळा, पारंपरिक खेळ, भजन-कीर्तन, हळदीकुंकू आणि महिलांच्या उंच स्वरातील मंगलाष्टके या गोष्टींनी घराघरात आनंद साजरा होत असे. पण आज हे सारे फेसबुक, इंस्टाग्रामच्या स्टोरीपुरते सीमित झाल्याचे चित्र दिसते. (Latest Pune News)
या सणांचा आत्मा हरवतोय कारण, सण साजरे करण्याची मानसिकता हरवत आहे. जुन्या पिढ्यांकडून चालत आलेली परंपरा, पारंपरिक शृंगार, पक्वान्नांचा स्वाद, कुटुंबीयांचे एकत्र येणे हे आता आजींच्या आठवणींमध्ये, जुन्या फोटोंमध्ये किंवा अल्बममध्येच उरले आहे.
वाढती स्पर्धा, व्यस्त जीवनशैली, परकीय संस्कृतीचा अतिरेक आणि डिजिटल माध्यमांचा अतिरेकी वापर यामुळे युवा पिढी सणांपासून दूर जाताना दिसते आहे. काही गावखेड्यांमध्ये अजूनही परंपरा जपल्या जातात, मात्र अशा उदाहरणांना अपवाद म्हणावे अशीच परिस्थिती आहे.
सण म्हणजे संस्कारांची शाळा
सण म्हणजे केवळ उत्सव नसतो, तर त्यामागे असते एक परंपरा, एक संस्कार, एक इतिहास. हा इतिहास केवळ पुस्तकांपुरता न राहता, प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची आज गरज आहे. नाहीतर उद्याच्या पिढ्यांना या सणांचा वारसा सांगणारे आणि त्याचे खरे अर्थ समजून सांगणारे वारसदारच उरणार नाहीत ्र ही कटू पण सत्य परिस्थिती आहे.