वेल्हे: पुण्यात गणेशोत्सवासाठी आलेल्या देशभरातील पर्यटकांसह तरुणाईने रविवारी (दि. 7) सिंहगडासह राजगड, तोरणा गडावर रिमझिम पावसात गर्दी केली होती. सिंहगड वन विभागाने नियोजन केल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येऊनही सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक काञ्च्ेंडी झाली नाही.
दरम्यान, शनिवारी (दि. 6) गणेश विसर्जन झाले. त्यासाठी पुण्यात आलेल्या पाहुण्या पर्यटकांनी रविवारी गडकोट पाहण्याचा आनंद लुटला. सिंहगड किल्ल्यावर सकाळपासूनच पर्यटकांची वर्दळ सुरू होती. गडावर रिमझिम पाऊस, दाट धुके, थंडगार वारे वाहत होते. या पावसाची पर्वा न करता दिवसभरात 12 ते 15 हजार पर्यटकांनी सिंहगडावर हजेरी लावली. (Latest Pune News)
सिंहगडावर पर्यटकांची दुचाकी 673 व चार चाकी 459 वाहने गेली. वाहनांने गडावर जाणार्या पर्यटकांकडून सिंहगड वन संरक्षण समितीने 80 हजार 550 रुपयांचा टोल वसूल केला. सिंहगड वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वाईकर, संदीप कोळी, नितीन गोळे रमेश खामकर आदी सुरक्षा रक्षक गडावरील वाहनतळापासून गडाच्या पायथ्यापर्यंत तैनात होते.
खडकवासला धरण चौपाटी, पानशेत, मढे घाट परिसरात पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती. धरण खोर्यातील डोंगररांगात दाट धुके, रिमझिम पावसात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईसह पर्यटकांची अक्षरक्ष झुंबड उडाली होती.
खडकवासला धरण चौपाटीवर सायंकाळी पाचनंतर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे पुणे - पानशेत रस्त्यावरील वाहतूक मंदगतीने सुरू होती. खडकवासला धरण माथ्याच्या दोन्ही बाजूला नांदेड, किरकटवाडी फाट्यापर्यंत दूर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदेड सिटीचे पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्यासह अधिकारी, पोलिस अंमलदार रस्त्यावर उतरले होते.