

भोर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही केलेल्या कामाचे श्रेय विरोधकांकडून घेतले जात आहे, अशी टीका आमदार शंकर मांडेकर यांनी केली.भोर एसटी आगारात आलेल्या नवीन पाच एसटी बसचा लोकार्पण सोहळा आमदार मांडेकर यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, यशवंत डाळ, विद्या पांगारे, नीलम झांझले, नितीन थोपटे, विलास वरे, सुनील भेलके, प्रवीण जगदाळे, अविनाश गायकवाड, विशाल कोडे, संदीप शेटे, मनोज खोपडे आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
मांडेकर म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. भोर विधानसभा मतदारसंघातील तीनही पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल. युतीबाबत पक्ष ठरवेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल.
भोर आगारात पहिल्या पाच आणि आता पाच अशा दहा गाड्या पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर झाल्या आहेत. महायुतीत स्थानिक आमदारांना श्रेय दिले जाते; मात्र, काही जण महायुतीत मागून आले असून आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत.
त्यांच्या काळात केलेल्या कामाचे श्रेय त्यांनी घ्यावे, अशी टीका मांडेकर यांनी माजी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव न घेता केली. भोर शहरात भूमिगत गटारे, भूमिगत वीजवाहिनी, नगरपलिका शाळा दुरुस्ती, पाणी योजनेसाठी निधी मंजूर केला आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल. भोर शहराचा चेहरा-मोहरा बदलला जाईल, असे मांडेकर यांनी सांगितले.