वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : लागोपाठ दोन आठवडे पडलेल्या अवकाळी पावसाने सिंहगड, राजगडासह परिसरातील डोंगररांगा हिरवाईने बहरल्या आहेत. परिणामी, रविवारी (दि. 2) सुटीच्या दिवशी किल्ले पर्यटन व निसर्गसौंदर्याचा आनंद अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांनी दोन्ही किल्ल्यांवर गर्दी केली होती.
सिंहगडासह राजगड सकाळीच हाऊसफुल्ल झाला होता. सिंहगडावर दिवसभरात पर्यटकांच्या 1 हजार 51 दुचाकी व 517 चारचाकी अशा एकूण 1 हजार 568 वाहनांची नोंद झाली. वन विभागाच्या वतीने पर्यटकांकडून एक लाखाहून अधिक रुपयांचे उपद्रव शुल्क वसूल करण्यात आले.
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वाहनसंख्या वाढल्याने सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वनपरिमंडल अधिकार्यांसह कर्मचारी, सुरक्षारक्षकांनी वाहतूक नियोजन केले. त्यामुळे मोठ्या संख्येने गर्दी होऊनही वाहतूक कोंडी झाली नाही.
राजगडावर दिवसभरात 4 हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. पुरातत्व खात्याचे पाहरेकरी बापू साबळे, पवन साखरे, सुरक्षारक्षक विशाल पिलावरे, आकाश कचरे यांनी मजुरांच्या साहाय्याने संजीवनी माची, पद्मावती माची तसेच पायी मार्गावरील गवत, झुडपे काढून साफसफाई सुरू केली आहे.
पावसाळी वातावरण असल्याने गडाच्या तटबंदी, बुरूज, पाऊलवाटांवर सापांची वर्दळ वाढली आहे. पर्यटकांना सर्पदंश होण्याचे प्रकार या दिवसांत होतात, त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पाऊलवाटांची साफसफाई केली जात आहे. पर्यटकांना खबरदारीचे आवाहनही करण्यात येत आहे.
बापू साबळे, पहारेकरी
हेही वाचा