दारूचे बिल चुकवून पळताना अपघात; तिघेजण गंभीर जखमी

file photo
file photo

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : 1 हजार रुपये दारूचे बिल चुकवून हॉटेलमधून मोटारसायकल घेऊन पळून जाताना कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावर उदगाव हद्दीत झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली.

यात तीन मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले असून जखमींना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या थरारक घटनेमुळे दारूचे चुकविलेले बिल जीवावर बेतले आहे.

उदगाव (ता. शिरोळ) येथील एका बारमध्ये गांधीनगर येथील तीन युवक रविवारी रात्री दारू पीत बसले होते. दारू पिऊन झाल्यानंतर तिघांनी हॉटेलमधून पळ काढला आणि मोटारसायकलवरून जोरदारपणे पळून गेले. तिघे दारूचे बिल चुकविण्याच्या नादात इतक्या जोरात मोटारसायकल घेऊन जात असताना बायपास मार्गावरील उदगाव येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ आल्यावर समोरून येणार्‍या दोन मोटारसायकल्सना जोराची भीषण धडक झाली.

या अपघातात गांधीनगर येथील तिघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. एकाच्या डोकीस गंभीर दुखापत झाली, तर दुसर्‍याच्या पायाचे हाड मोडले आहे. तसेच तिसर्‍या युवकाच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी जखमींचा मोठा रक्तस्राव सुरू होता. त्यांनतर तातडीने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे सांगली-कोल्हापूर बायपास मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली नव्हती.

1 हजारासाठी जीवाची बाजी

उदगाव येथील एका हॉटेलमध्ये तिघेसुमारे एक तास बसून दारू प्यायले; मात्र यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून की बिल बुडवायचे म्हणून या तिघांनी हॉटेलमधून पळ काढला. त्यांच्या दारूचे बिल फक्त 1 हजार रुपये झाले होते. त्यामुळे बिल बुडवून पळून जात असताना अपघात झाला आणि यात तिघेही गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे 1 हजारासाठी जीवाची बाजी लावून पळणार्‍यांना आयुष्याची अद्दल घडली, अशी चर्चा सुरू होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news