खडकवासला: तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या खोपडेवाडी, मेटपिलावरे, कोंढाळकरवाडी, धनगरवस्तीतील शेतकरी, रहिवाशांना कुंबळजाई ओढ्यावर पूल नसल्याने दररोज धोकादायक प्रवास करावा लागत आहे. संततधार पावसामुळे ओढ्याला पूर आला असून, कुजलेल्या लाकडाच्या साकवावरून जीव मुठीत धरून मजूर, शेतकर्यांना अवजारे घेऊन जावे लागत आहेत. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता आहे.
प्रशासनाने गेली कित्येक वर्षे या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने या ओढ्यावर बारमाही पूल व दोन्ही बाजूला रस्ता तयार झाला नाही. तोरणागडाच्या कुंबळजाई बुरुजाच्या कड्यातून ओढ्याचा उगम आहे. दोन्ही बाजूला डोंगररांगा आहेत. (Latest Pune News)
ओढ्याचे पात्र ओलांडण्यासाठी स्थानिक शेतकर्यांना दर वर्षी ओढ्यावर तात्पुरता लाकडी साकव उभा करावा लागतो. गेल्या दोन महिन्यांपासून पडत असलेल्या पावसामुळे लाकडे कुजून कुमकुवत झाली आहेत. स्थानिक शेतकर्यांना ओढ्याच्या पुरातून बैल, शेतीची अवजारे न्यावी लागत आहेत.
स्थानिक शेतकरी गणेश पिलावरे, बंडु बर्गे, दीपक पिलावरे, बाळु करंजकर, वाल्मीक करंजकर, दगडू भोरेकर, बबनराव भोसेकर, सोमनाथ शिंदे, चंद्रकांत पिलावरे, भागुजी पिलावरे आदींची शेती ओढ्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे त्यांना दररोज जीव धोक्यात घालून ओढा ओलांडावा लागतो.
तोरणा विभाग मावळा जवान संस्थेचे कार्याध्यक्ष तानाजी कचरे म्हणाले, ओढ्यावरून पुलासह दोन्ही बाजूंना बारमाही रस्त्यासाठी जमीन देण्यास मेटपिलावरे, खोपडेवाडी, कोंढळकरवाडी, धनगर वस्ती येथील शेतकर्यांची संमती आहे. त्यामुळे शासनाने हा रस्ता तयार करावा.
मेटपिलावरे येथील भागूजी पिलावरे म्हणाले, मेटपिलावरे गावात ग्रामपंचायत कार्यालय असल्याने कागदपत्रांसाठी खोपडेवाडी, कोंढाळकरवाडी आदी वाड्या-वस्त्यांतील विद्यार्थी, रहिवाशांना ओढ्यातून जावे लागते.
राजगड विभागाचे उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे यांच्यासह आम्ही सदर ओढा व रस्त्याची पाहणी केली. या ठिकाणी बारमाही रस्ता झाल्यास तोरणागडाच्या दोन्ही बाजूंच्या वाड्या-वस्त्यांत गावांतील शेतकर्यांसह रहिवाशांना जवळच्या अंतराचा बारमाही रस्ता उपलब्ध होणार आहे. यासाठी जागेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
- निवास ढाणे, तहसीलदार, राजगड तालुका