

पुणे: जिल्ह्यात ई-हक्क, ई-फेरफारसह खरेदी-विक्रीच्या दस्तांवरून सातबारा उतार्यावर वेळेत नोंद न करणारे, तसेच नागरिकांची अडवणूक करणार्या तलाठी आणि मंडल अधिकार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कूळकायदा शाखेत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी दोन ग्राम महसूल अधिकार्यांची (तलाठी) नेमणूक करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षातून ई-हक्क प्रणालीमध्ये सर्वाधिक अर्ज प्रलंबित ठेवणारे किंवा अर्ज नाकारण्याचे प्रमाण जास्त असलेल्या तलाठी व मंडल अधिकार्यांशी थेट संवाद साधून कारणे विचारली जाणार आहेत. (Latest Pune News)
मंडल अधिकार्यांकडे एक महिन्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या, तसेच तीन महिन्यांहून अधिक जुने फेरफार यांची माहिती ’मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’द्वारे घेऊन संबंधित अधिकार्यांशी संपर्क केला जाणार आहे.
त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांची माहिती घेतली जाईल. अडचणी असल्यास त्यादेखील समजून घेण्यात येतील. तसेच गावपातळीवर काम करताना ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकार्यांना येणार्या अडचणी स्थानिक स्तरावरच ऑनलाइन माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आवश्यक असल्यास नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरची मदत घेण्यात येईल.
ई-हक्कप्रमाणे, ई-फेरफारमधील नोंदींचा निर्गम कालावधी जास्त असलेल्या मंडल अधिकार्यांचा पाठपुरावा करून तो कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाकडून ग्राम महसूल अधिकार्यांना ऑनलाइन प्राप्त होणार्या दस्तांचा वेळेवर आढावा घेणे, नमुना 9 ची नोटीस वेळेत तयार करून बजावणे इत्यादी कामांचाही पाठपुरावा केला जाईल.
या सर्व कामकाजाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॅशबोर्डवर गावनिहाय उपलब्ध राहील. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडल अधिकार्यांच्या कामावर जिल्हाधिकारी थेट नियंत्रण ठेवू शकणार आहेत.
जमीन खरेदी-विक्रीच्या दस्तांवरून सातबारा उतार्यावर नोंद घेणे, बोजा दाखल करणे किंवा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे इत्यादी फेरफार संबंधित कामांसाठी नागरिक ऑनलाइन किंवा तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करतात. तलाठी फेरफार करून ते मंडल अधिकार्यांकडे ऑनलाइन पाठवतात. मात्र काही ठिकाणी तलाठ्यांकडून जाणीवपूर्वक अडवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकारांना लगाम घालण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी पुढाकार घेऊन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.