पासपोर्टच्या धर्तीवर ‘टोकन’ पद्धतीने जातपडताळणी : अर्जदारांना दिलासा

पासपोर्टच्या धर्तीवर ‘टोकन’ पद्धतीने जातपडताळणी : अर्जदारांना दिलासा

पुणे : राज्यातील विद्यार्थी आणि नागरिक यांना विविध कामांसाठी आवश्यक असलेले जातपडताळणी प्रमाणपत्र आता पासपोर्टच्या धर्तीवर 'टोकन' पद्धतीने मिळणार आहे. त्यासाठी नवीन संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. या पद्धतीमुळे नागरिक, विद्यार्थी तसेच कागदपत्रांची तपासणी करणार्‍या समितीचाही वेळ वाचेल आणि अर्जदारांचा मनस्ताप कमी होईल.

राज्यातील नागरिक, विद्यार्थी यांना शैक्षणिक काम, नोकरी, याचबरोबर राजकीय क्षेत्रात कार्यरत प्रतिनिधींना निवडणूक लढविण्यासाठी पुरावा म्हणून जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालय सुरू केले आहे. प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. अर्जाच्या तपासणीसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी पासपोर्ट काढण्यासाठी वापरण्यात येणार्‍या 'टोकन' पद्धतीचा वापर जातपडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठीही करण्यात येणार आहे.

किती अर्जदारांना एका दिवशी बोलवायचे, याचा 'कोटा' ठरविण्यात येणार आहे. यामुळे जातपडताळणी कार्यालयात होणारी अर्जदारांची गर्दी कमी होईल. याशिवाय कार्यालयात असलेल्या प्रत्येक समितीसमोरील अधिकार्‍यांवर कागदपत्रांची तपासणी करताना लागणारा वेळ कमी होणार आहे. त्याहून आणखी विशेष बाब म्हणजे, कागदपत्रांची छाननी करताना काही कागदपत्रे अपूर्ण असतील किंवा अर्ज करताना काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्याची पूर्तता जागेवरच करणे अर्जदारांना सोयीचे होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करावा लागणार; त्यानंतर कळेल तारीख

या पद्धतीनुसार जातपडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदारास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयामार्फत अर्जदाराला कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी केव्हा यायचे, याबाबत वेळ आणि तारीख कळविण्यात येईल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news