वणवे प्रतिबंधासाठी मेळघाट प्रकल्पाचे मॉडेल राबविणार

वणवे प्रतिबंधासाठी मेळघाट प्रकल्पाचे मॉडेल राबविणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'वणवे प्रतिबंधासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने केलेले यशस्वी उपक्रम पुढील काळात पुणे वनविभागात राबवण्यात येतील,' असे आश्वासन वनविभागाचे पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिले.

जिल्ह्यात लागणार्‍या वन वणव्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यासंबंधी उपाययोजनांबाबत पुणे वन विभागाच्या वतीने दूरदृश्य प्रणालीद्वारे वन वणवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

प्रवीण म्हणाले, 'वन वणवा लागल्याने जंगल, वन्य जीव आदी जैवविविधतेचे नुकसान होण्यासह परिसरातील शेतीचेही प्रचंड नुकसान होते. वने नष्ट झाल्यामुळे वन्य जीव शेजारील शेतीकडे वळल्याने मोठ्या प्रमाणात नासधूस होते. त्यामुळे वणवे लागू नयेत यासाठी, तसेच वणवे विझवण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे येत वनकर्मचार्‍यांना मदत करावी. वनविभागाने वणवे लावणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.'

मेळघाट वनक्षेत्रात आग प्रतिबंधक कक्ष (फायर सेल) स्थापन करण्यात आला असून, नासाचा उपग्रह, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया यांच्याकडून वणव्याची माहिती (अलर्ट) येताच तत्काळ आग प्रतिबंधाचे काम सुरू होते. या पद्धतीने काम केल्यामुळे मेळघाट क्षेत्रातील वणव्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करताना मृत्युमुखी पडलेले वनशहीद सदाशिव नागठाणे यांना या परिषदेदरम्यान श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावर्षी विभागात वणव्याच्या 65 घटना

पुणे वनविभागाच्या क्षेत्रात वणव्यांच्या 2020 मध्ये 391 घटना, तर 2021 मध्ये 397 घटना आणि एप्रिल 2022 पर्यंत 65 घटना घडल्या आहेत. पुणे वनविभागात सुमारे 40 टक्के वनक्षेत्र वनविभागाच्या हद्दीतील असून, अन्य वनक्षेत्र जिल्हा परिषद, महानगरपालिका, तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील मालकी वनक्षेत्र आणि काही ठिकाणी खासगी वनक्षेत्र आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news