

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहू-तळवडे मार्गावरील वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक होताना दिसत आहे, त्यामुळे पोलिसांबरोबरच वाहनचालकही त्रस्त झाले आहेत.
वाहनांच्या लांबच्या लांब रांगा
तीर्थक्षेत्र देहू – आळंदी मार्गावर, देहू-तळवडे दरम्यान असलेल्या रस्त्यावर एका ठिकाणी कमान बांधण्याचे, तसेच पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या टाकण्याचे कामही सुरू आहे. जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परिणामी, तासन् तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पायी प्रवास करणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे ही कामे पावसाळ्यात करू नयेत, अशी मागणी त्रस्त झालेले वाहनचालक आणि ग्रामस्थ करू लागले आहेत.
अधिक महिन्यामुळे भाविकांची देहूत गर्दी
भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणार्या भूमिगत मुख्य जलवाहिन्या टाकण्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू आहे. त्यामुळे आळंदीकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला आहे. तेथे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. याला दीड महिना लोटला आहे. पाऊसही मोठ्या प्रमाणात पडत आहे. अधिक मासामुळे तीर्थक्षेत्र देहूत वारकरी, भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. चाकण, भोसरी, तळवडे परिसर आणि एमआयडीसीमध्ये छोटे-मोठे कारखाने असल्याने कामगारांच्या वाहनांचीही लक्षणीय अशी वर्दळ या मार्गावर असते.
तळवडे वाहतूक नियंत्रक विभागाच्या पोलिसांची भरपावसात ही वाहतूक कोंडी सोडविताना दमछाक होत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे अत्यावश्यक कामे वगळता, इतर कामे पावसाळ्यानंतर करण्यात यावीत, वाहतुकीस रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी त्रस्त झालेले वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थ आणि कामगार करू लागले आहेत. नागरिक याबाबत अनेक तक्रारी करीत असतानाही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे वाहनचालक, ग्रामस्थ महापालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त करत आहेत.
पावसामुळे रस्त्याची दुरवस्था
जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले खड्डे, रस्त्यावर पडलेला त्याचा राडारोडा, पडलेले खड्डे, साचलेली गाळमिश्रित पाण्याची डबकी, रस्त्यावर निर्माण झालेला गाळ यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकेरी वाहतुकीमुळे वाहनांच्या एक-दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत, त्यामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
हेही वाचा :