चिंचवड येथे बीआरटी मार्गात थरार; बस डिव्हायडरला धडकवली

चिंचवड येथे बीआरटी मार्गात थरार; बस डिव्हायडरला धडकवली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निगडी ते वारजे माळवाडी धावणारी पीएमपी बुधवार (दि. 29) सकाळी अकराच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे बीआरटी मार्गामधून जात होती. दरम्यान, बस चिंचवड येथील डी-मार्ट समोर आली असता, सर्व्हिसरोडमधून ग्रेडसेपरेटरमध्ये जाणार्‍या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या नादात पीएमपीचा अपघात घडला. बस वेगात असल्याने पीएमपी चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने त्याने बस डिव्हायडरवर धडकवली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कुठली ईजा झाली नाही.

पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातील बीआरटी मार्ग हे धोकादायक बनले आहेत. बीआरटी मार्गामधून जाणार्‍या बस भरधाव नेल्या जातात. ग्रेडसेपरेटरमधून जाणार्‍या व येणार्‍या वाहनांसाठी पालिकेने मर्ज ईन अथवा मर्ज आऊट दिलेले आहेत. अशा ठिकाणी पीएमपी चालकांनी वाहनांचा वेग कमी करणे आवश्यक आहे; मात्र तरीही पीएमपी चालक आपल्या ताब्यातील वाहने बीआरटी मार्गातून भरधाव दामटवतात. त्यामुळे सर्व्हिसरोडवरून ग्रेडसेपरेटरमध्ये जाताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत; तसेच बीआरटी मार्गातून जाणार्‍या बसेस वाहतूक नियमांकडे डोळेझाक करून सर्रास सिग्नल तोडून वाहने नेत असल्याबाबतचे वृत्त 'पुढारी'मध्ये (दि. 25 मे) रोजी प्रसिद्ध झाले होते. तरीही याकडे पीएमपीच्या संबंधित अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

चिंचवड येथील सर्व्हिसरोडवरून ग्रेडसेपरेटरमध्ये जाणार्‍या दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अचानक आडवे घातल्याने पीएमपी चालकास वाहनवर नियंत्रण ठेवता आले नाही. परिणामी चालकाने अपघात टाळण्यासठी बस डिव्हायडरला धडकवली. त्यामुळे मोठा अपघात टळला. यावेळी मर्ज इनच्या सिग्नलचा पोल तुटला; तसेच पीएमपीचे देखील नुकसान झाले. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कुठलीच ईजा झाली नाही. मात्र पीएमपी भरधाव असल्याने मोठा अपघात घडला असता, अशी भीती प्रवासी आणि प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.

या घटनेबाबत दुचाकीस्वारास वाचविण्यासाठी बस डिव्हायडवर धडकवावी लागल्याचे पीएमपी चालकाने पिंपरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बीआरटी धोकादायक?

शहरातील बीआरटी मार्ग हे धोकादायक बनले आहे. 2023-24 यादरम्यान बीआरटी मार्गातील 61 अपघातात 9 नागरिकांचा मृत्यू झाला. तर या वर्षात जानेवारी महिन्यात दोन अपघातांमध्ये सहा नागरिक गंभीर, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित घटनेची चौकशी करून, त्याबाबत निर्णय घेतला जाईल. वाहनचालक दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल; तसेच चालकांनी बीआरटी मार्गात मर्यादित वेगात वाहन चालविणे आवश्यक आहे. याबाबत विविध उपक्रमांद्वारे जागृती केली जात आहे.

– यशवंत हिंगे,
आगार प्रमुख, निगडी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news