Blood sample manipulation case : जबाबदारी झटकली अन् काळे पळाले!

Blood sample manipulation case : जबाबदारी झटकली अन् काळे पळाले!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डॉ. अजय तावरे यांची कारकीर्द वादग्रस्त असूनही गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकपद सोपवण्यात आले होते. डिसेंबर 2023 मध्ये डॉ. तावरे यांच्या नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांचे शिफारस पत्र आणि त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा शेरा असल्यामुळे डॉ. तावरेला पुन्हा अधीक्षकपद दिल्याचे डॉ. विनायक काळे यांनी सांगितले. ससून सर्वोपचार रुग्णालय राज्यातील नामांकित संस्था असून, येथे टीम वर्क आहे. ससूनमध्ये गेल्या काही काळात दुर्दैवाने गैरप्रकार घडत असले, तरी त्यासाठी वरिष्ठ व्यक्तीला एकट्याला जबाबदार धरता येत नाही, असे स्पष्ट करत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी गैरप्रकाराची जबाबदारी झटकली. पत्रकारांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न देताच काळे अधिष्ठाताच्या कार्यालतात निघून गेले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बिल्डरपुत्र आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हारनोळ यांना अटक केली. याबाबत अंतर्गत कारवाईची माहिती देण्यासाठी डॉ. काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, डॉ. सविता कांबळे आदी उपस्थित होते. ससूनमध्ये सातत्याने गैरप्रकार घडत असून, ससूनची प्रतिमा धुळीस मिळत आहे. याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार का, अशी विचारणा करताच, 'ससून ही मोठी संस्था असून, सर्व विभागांचे प्रमुख, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांचे 'टीम वर्क' आहे. अधिष्ठाता प्रत्येक बाबीमध्ये वैयक्तिकरीत्या लक्ष घालू शकत नाहीत. इतर अधिकार्‍यांकडून माहिती घेतली जाते. मी दररोज 10 तास संस्थेच्या कार्यालयात कार्यरत असतो. मात्र, दुर्दैवाने गैरप्रकार घडत असले, तरी कोणा एकाला जबाबदार धरता येणार नाही', असे म्हणून त्यांनी हात झटकले.

पत्रकार परिषद सोडून गेले

डॉ. विनायक काळे यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले नाही. पत्रकार परिषदेतून तातडीने उठून निघून ते अधिष्ठाता कक्षात गेले. त्यानंतर डॉ. काळे यांनी अधिष्ठाता कार्यालयातील स्वत:च्या केबिनचे दोन्ही दरवाजे आतून लॉक करून घेतले. पोलिसांना फोन करून त्यांनी केबिनच्या बाहेर चार सुरक्षारक्षक अणि चार पोलिस तैनात करण्यास सांगितले. त्यामुळे अधिष्ठाता कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते.

आयएमएकडून निषेध

महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन आणि ससून प्रकरणात डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांची अटक, या घटना वैद्यकीय क्षेत्राला गालबोट लावणार्‍या आहेत. दोन्ही घटनांचा इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे निषेध करण्यात आला आहे. गैरप्रकाराच्या घटनांमध्ये योग्य ती चौकशी होऊन दोषींना न्यायव्यवस्था शिक्षा देईलच, असेही आयएमएतर्फे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news