

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील सामाजिक शांतता अबादीत रहावी या दृष्टीने सराईतांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी शहरातील 2 हजार 924 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यापैकी 614 सराइत मूळ पत्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
गुन्हे शाखेतील पथके यात सहभागी झाले होती. बेकायदा शस्त्र बाळगणार्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 15 कोयते. दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. लोणी काळभोर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून चार किलो गांजा जप्त केला. अमली पदार्थ विक्री प्रकरणात एकास अटक करण्यात आली. बेकायदा गावठी दारू विक्री प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
41 सरईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, शहरातील 130 लॉज, हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी शस्त्रे, गावठी दारू, अमली पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला. नाकाबंदी दरम्यान 554 संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी 14 जणांवर कारवाई करण्यात आली. शहरातील सरईतांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबविण्यात आली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुुक्त रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील, रोहिदास पवार, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वेगवेगळ्या भागात मोहिम राबविण्यात आली.