चाकण/खेड: बँकेने जेसीबी (एमएच 12 एसयू 3165) मशिन जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यानंतर देखील जेसीबी जप्त करून शशांक हगवणे याच्या ताब्यात देणार्या तिघा रिकव्हरी एजंटांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी (दि. 5) अटक केली. त्यामुळे जेसीबी फसवणूक प्रकरणात वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपी हगवणे माय-लेकासह आता पाच आरोपींचा समावेश झाला आहे.
योगेश रासकर (वय 25, रा. तळेगाव ढमढेरे), गणेश पोतले (वय 30, रा. मोहितेवाडी) आणि वैभव पिंगळे (वय 27, रा. तळेगाव ढमढेरे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. प्रशांत येळवंडे (वय 33, रा. निघोजे, ता. खेड) यांनी 29 मे रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) या माय-लेकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (Latest Pune News)
लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशिन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा 50 हजारांची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते. मात्र, त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशिन येळवंडे यांच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेतले.
येळवंडे हे संबंधित रक्कम किंवा मशिनची मागणी करण्यासाठी गेले. त्या वेळी शशांकने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात येळवंडे यांना 11 लाख 70 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला.
यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून मंगळवारी (दि. 3) या माय-लेकांना ताब्यात घेतले. राजगुरुनगर न्यायालयात हजर केले असता दोघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी इंडसइंड बँकेचे कायदा व्यवस्थापक यांच्याकडे चौकशी केली असता या गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकव्हरी एजंटला सूचना दिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असताना आरोपी रासकर, पोतले आणि पिंगळे या तिघांनी बेकायदेशीरपणे फिर्यादी येळवंडे यांच्या चालकाकडून जेसीबी मशिन घेऊन ते आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार या तिघांनाही महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटकेतील तिघाही जणांना खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. नाईकनवरे-गरड यांच्या न्यायालयात गुरुवारीच हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने या तिघांना तपासासाठी 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.दरम्यान, शशांक व लता हगवणे यांची पोलिस कोठडी शुक्रवारी (दि. 6) संपणार आहे. त्यांना पुन्हा येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.