

पुणे: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 7) शहरातील काही भागांत वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या दिवशी मुस्लिम बांधव आपापल्या मोहल्ल्यातील मशिदी व ईदगाह मैदानावर एकत्र येऊन सामूहिक नमाजपठण करतात.
गोळीबार चौकाजवळील ईदगाह मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि वाहनांची गर्दी होते. त्यामुळे गोळीबार मैदान चौक भागातील वाहतूकीत बदल करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे (मुख्यालय/अतिरिक्त कार्यभार वाहतूक) यांनी दिले आहेत. (Latest Pune News)
त्यानुसार 7 जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौक आणि सीडीएओ चौक ते गोळीबार मैदान चौक या मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येणार आहे. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांसारखी अत्यावश्यक सेवेतील वाहने यामधून वगळण्यात आली आहेत.
शहरातील इतर भागांमधील ईदगाह मैदानांवरही नमाज पठण होत असते. त्या भागांतील वाहतूक परिस्थितीनुसार बंद करण्यात येईल किंवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल. त्यामुळे वाहनचालकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी केले आहे.
असे असतील वाहतुकीतील बदल
भैरोबा नाला ते गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक भैरोबा नाला येथे आवश्यकतेनुसार सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत बंद राहील. यावेळी स्वारगेटकडे जाणारी जड वाहने (फक्त मार्केट यार्डसाठी) प्रिन्स ऑफ वेल्स रोडने लुल्लानगर चौक मार्गे जातील, तर पुणे स्टेशनकडे जाणारी हलकी वाहने इम्प्रेस गार्डन रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
मम्मादेवी चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहने मम्मादेवी चौक - बिशप स्कूल मार्गे किंवा कमांड हॉस्पिटल मार्गे पुढे इच्छित स्थळी किंवा नेपीयर रोडने पुढे सीडीओ चौकातून इच्छित स्थळी जातील.
सीडीओ चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाज पठण काळात सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहील. लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकात डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील. तसेच खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळून नेपीयर रोडने मम्मादेवी चौकातून सरळ बिशप स्कूल मार्गे जातील. (खटाव बंगला चौकातील उजवीकडील वळणावरील बंदी तात्पुरती उठवण्यात येईल.)
सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद राहील. ही वाहने सॅलसबरी पार्क - सीडीओ चौक - भैरोबानाला मार्गे जातील.
जुनी सोलापूर बाजार चौकी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक बंद राहील. खाणे मारुती चौकाकडून येणारी वाहने पुलगेट डेपो, सोलापूर बाजार चौक मार्गे सरळ नेपीयर रोडने, खटाव बंगला मार्गे किंवा मम्मादेवी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
लुल्लानगर चौकातून गोळीबारकडे येणार्या सर्व जड मालवाहतूक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने, एसटी बसेस, पीएमपीएमएल बसेस यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. या वाहनांनी लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.