

Women safety in public transport
पुणे: शहर पोलिसांनी पीएमपीच्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेमुळे प्रवासात महिलांची सुरक्षितता वाढणार आहे. पीएमपीने महिला प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानंतर ही बाब गांभीर्याने घेत पोलिस आयुक्तांकडून विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत.
काय आहे ही मोहीम?
या मोहिमेअंतर्गत पुणे शहर पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. या पथकात 4 पोलिस अधिकारी (2 पोलिस निरीक्षक, 1 सहायक पोलिस निरीक्षक, 1 पोलिस उपनिरीक्षक) आणि 22 पोलिस कर्मचार्यांचा समावेश आहे. हे पथक पीएमपीच्या बसमधून प्रवास करणार आहे. यामुळे बसमधील आणि बसस्थानकांवरील गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे. (Latest Pune News)
आता काय होणार?
पुणे पोलिसांचे हे विशेष पथक गर्दीच्या मुख्य बसस्थानकांवर तसेच गर्दीच्या मार्गांवर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत नियमित गस्त घालणार आहे. याशिवाय, हे पथक बसमधून प्रवास करून प्रत्यक्ष कारवाई करेल. यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित वाटेल आणि बसप्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रवाशांना करावा लागत होता ‘या’ समस्यांचा सामना
गेल्या काही काळापासून पीएमपीच्या प्रवाशांना, विशेषतः महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची, पाकिटांची चोरी, अश्लील हावभाव किंवा शब्दांचा वापर करून महिला प्रवाशांना त्रास, असामाजिक घटकांकडून बसस्थानकांमध्ये अश्लील मजकूर लिहिणे किंवा चित्रे काढण्याच्या घटना, यांमुळे महिला प्रवासी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी पीएमपी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.