

पुणे: अभियांत्रिकीच्या प्रवेश एक दिवस उरला आहे. मात्र, महाआयटीच्या गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे प्रवेश धोक्यात आले आहेत. मुदत संपत आल्यानंतरही दाखले मिळत नसल्याने पिंपरीतील यश भानुशाली यांनी शेवटी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे दाद मागितली. पण, महाआयटीकडून सर्व्हरचे कामकाज ठप्प असल्याने प्रशासनानेही हात टेकल्याचे दिसत आहे.
अभियांत्रिकी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मंगळवारी (दि. 8) कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही उत्पन्नाचा दाखला मिळालेला नाही. त्याशिवाय त्याला ईडब्ल्यूएसचा दाखला काढणे शक्य नाही. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. (Latest Pune News)
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. त्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची शेवटची तारीख मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. मात्र, गेल्या मे महिन्यापासून सुमारे दहा हजारांवर अधिक दाखले अद्यापही विद्यार्थ्यांना देता आलेले नाहीत. हवेली तहसील तसेच अतिरिक्त तहसील कार्यालय पिंपरी आणि लोणी काळभोर या तीन कार्यक्षेत्रांमधील विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हवेली पिंपरी आणि लोणी काळभोर मधील परिसराचे नकाशे नीटपणे सर्व्हरवर अपलोड न केल्यानेच ही समस्या निर्माण झाली असल्याचे पिंपरीतील नागरी सुविधा केंद्रचालक शिवाजी देवकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महाआयटीकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
महाआरटीच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. याबाबत विद्यार्थी व पालकांनी तक्रार केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी महाआयटीच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे दाखले अडकलेले आहेत आणि मंगळवारची मुदत आहे, अशा विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज करावेत. तहसीलदारांनीही तातडीने हे दाखले द्यावेत, असे आदेश दिले आहेत.
- ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी