पुणे: महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला एक महिन्यापूर्वी नॅशनल मेडिकल कौंन्सिलने नोटीस पाठवली होती. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय गांभीर्याने घेण्यात आला आहे.
नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेत स्थलांतरित होत असलेल्या इमारतींचे काम वेगाने पूर्ण केले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत इमारतीच्या दोन विंगचे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. (Latest Pune News)
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजावर आयोगाने ठपका ठेवला. पायाभूत सुविधांचा अभाव, प्राध्यापकांची कमतरता, अपूर्ण आकृतीबंध अशा अनेक त्रुटींबाबत जाब विचारला. अनेकदा सूचना देऊनही त्रुटी दूर करण्याबाबत कार्यवाही होत नसल्याने कॉलेज बंद का करू नये आणि एक कोटी रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशी विचारणा केली.
याबाबत महाविद्यालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने कार्यवाहीसाठी मुदत मागितली होती. महाविद्यालयाच्या कामकाजाबाबत आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत गुरुवारी ट्रस्टची बैठक होणार आहे. तत्पूर्वी अतिरिक्त आयुक्त पी. चंद्रन यांनी मागील आठवड्यात मेडिकल कॉलेजला भेट दिली आणि सर्व कामकाजाची माहिती देऊन आढावा घेतला.
या पार्श्वभूमीवर नायडू रुग्णालय परिसराच्या इमारतीतील दोन विंगचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर तातडीने वसतिगृह, महाविद्यालयाच्या स्वतंत्र रुग्णालयाने कामही पूर्ण केले जाणार आहे.
कंत्राटी अध्यापकांचा करार 11 महिन्यांऐवजी जास्त कालावधीचा होणार?
महापालिकेने मेडिकल कॉलेजमधील शिक्षकभरती प्रक्रियेबाबत कार्यवाहीला सुरुवात केली आहे. अनेकदा जाहिराती देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट 11 महिन्यांऐवजी जास्त कालावधीचा करण्याचा प्रयत्न आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय विभागांच्या नियोजनालाही गती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा उपकरणे, ग्रंथालय आणि डिजिटल लर्निंग साधनांची खरेदी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे.
मेडिकल कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक सुधारणा करून स्वतंत्र इमारतीचे बांधकाम, मनुष्यबळ याबाबत वेगाने कार्यवाही केली जाणार आहे. पहिल्या दोन विंगमध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, स्टाफ रूम आणि मूलभूत वैद्यकीय सुविधा यांचा समावेश केला जात आहे. ऑगस्टपर्यंत दोन विंगचे काम पूर्ण करून कॉलेजसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याबाबत आयुक्तांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी बैठक होणार आहे.
- पी. चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका