

Pune Agricultural Market News
पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी सोमवारी (दि. 7) सभापतिपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे सुपूर्त केला. जगताप यांनी तो स्वीकारला असून, मागील काही दिवसांपासून बाजार समितीत गैरकारभार सुरू असल्याची सातत्याने चर्चा होत होती. त्या पार्श्वभूमीवर सभापतींनी राजीनामा दिल्याची चर्चा बाजार घटकांमध्ये सोमवारी रंगली होती.
बाजार समितीतील गैरकारभाराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती. (Latest Pune News)
तर वडगावशेरीचे आमदार बापू पठारे यांनी बाजार समितीविषयी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. तर 2023 मध्ये तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनीही संचालक मंडळाच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश दिले होते. ती चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. यापूर्वी सभापतींवर एकदा अविश्वासाचा ठरावही आणण्यात आला होता.
मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिला आहे. उपविधीतील तरतुदीनुसार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर हे नवीन सभापती निवडीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवतील आणि त्यामध्ये नवीन सभापतीची निवड केली जाणार आहे.
काळभोर हे बाजार समितीवर 20 वर्षे प्रशासक होते. त्यानंतर 25 महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. त्यानंतर संचालक मंडळ आले. 9 मे 2023 रोजी ते सभापती बनले होते. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करतेवेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, बाजार समितीचे माजी सभापती ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी की भाजप?
बाजार समितीवर विजयी झालेले संचालक मंडळ राष्ट्रवादी, भाजपसह विविध पक्षांचे संमिश्र आहे. सभापती दिलीप काळभोर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) होते. त्यामुळे पुढचा सभापती भाजपचा होणार की राष्ट्रवादीचा, याबाबत बाजारात उत्सुकता आहे.
यामध्ये माजी सभापती ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, संचालक राजाराम कांचन आणि संचालक रामकृष्ण सातव यांच्या नावाची सभापतिपदासाठी चर्चा आहे. कोणाच्या गळ्यात सभापतीची माळ पडणार, याची चर्चा बाजारघटकांत आहे.
सभापतिपदाच्या कार्यकाळात बाजार समितीचे उत्पन्न वाढले. तसेच, बाजार विकासाची कामे सर्व संचालक तसेच बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचार्यांच्या सहकार्यामुळे पूर्ण करू शकलो.
- दिलीप काळभोर, मावळते सभापती, पुणे बाजार समिती