सुषमा नेहरकर- शिंदे
राजगुरुनगर: शेतकर्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी शासन व प्रशासकीय पातळीवर सर्व नियम धाब्यावर बसवून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
यासाठी सध्या पुणे जिल्ह्यासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात हजारो एकरवरील जंगले, शेकडो वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल केली जात आहे. जुन्नर तालुक्यातील हिवरे येथे हा प्रकल्प उभारण्यासाठी गायरान जमिनीतील जंगल भुईसपाट करण्यात आले, तर खेड तालुक्यातील पांगरी येथील तब्बल सहा ते सात हेक्टरवरील सामाजिक वनीकरण क्षेत्रातील वृक्षतोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Latest Pune News)
राज्यातील शेतकर्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी गाव पातळीवर खासगी अथवा सरकारी जागेचा वापर केला जात आहे. सध्या प्रत्येक जिल्हासाठी विशेष टार्गेट देण्यात आले असून, सर्व पातळीवर अत्यंत तत्परता दाखवली जात आहे.
परंतु यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि गायरान जागांचा वापर केला जात आहे. जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकारी योजनेचे प्रमुख असल्याने प्रस्ताव दाखल केल्यानंतर सर्व पातळीवर तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी गावातील हजारो हेक्टर जमिनीचे सपाटीकरण करण्यात येते. यासाठी गायरान, वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या जागेतील शेकडो हेक्टरवरील झाडांची कत्तल केली जात आहे.
शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून येणाऱ्या पिढ्यांना संकटात टाकण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे. खेड तालुक्यातील पांगरी या ठिकाणी बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वनीकरणाची वृक्षतोड करण्यात आलेली आहे. या जागेत देखील सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात येत आहे.
शेकडो वर्षे जुन्या झाडांपेक्षा बैलगाडा घाट महत्त्वाचा
जुन्नर तालुक्यातील हिवरे गावात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या. परंतु एका जागेमुळे गावातील बैलगाडा घाट अडचणीत येत असल्याने गावातून विरोध झाला. त्यानंतर गावातील गायरान जमीन निश्चित करण्यात आली. या जागेवर अत्यंत जुनी व प्रचंड मोठी वृक्ष उभे असून, ही वृक्षतोड करण्यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग, महसूल विभाग यांनी तातडीने वृक्षतोड करण्यास परवानगीदेखील दिली. सध्या हिवरे गावात या सौर कृषी वाहिनी योजनेसाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात येत आहे.