हडपसर: सातववाडी परिसरात गेली दोन महिन्यांपासून सांडपाणीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
परिसरातील नटराज कॉलनी, राहुल कॉलनी, महापौर कॉलनी भागात काही ठिकाणी गढूळ, तर काही ठिकाणी सांडपाणीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. या ठिकाणी पहाटे साडेपाचच्या दरम्यान पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सुरुवातीला सुमारे अर्धा तास दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ते पाणी सोडून द्यावे लागत असल्याने रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. (Latest Pune News)
दूषित पाण्यामुळे नागरिक व लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे. या पाण्याची दुर्गंधी येत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना वारंवार तक्रार करूनही अद्यापही दखल घेतली नसल्याचे रहिवासी संजय यादव, विशाल वाळके, आशा कांबळे, गोरख गाडे, पप्पू यादव, ललिता गाडे, रूपाली जाधव, जयश्री जाधव, जया गायकवाड आदींनी सांगितले.
मागील दोन महिन्यांपूर्वी येथे सांडपाणी वाहिनीचे काम झाले आहे. तुकाईदर्शन येथील पाण्याच्या टाकीजवळ व्हॉल्व्ह असून, तेथेच सांडपाणी वाहिनी असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी जमा होत आहे. जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिनी शेजारी असल्याने काही गळती होऊन परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे पाणी सोडणार्या कर्मचार्यांनी सांगितले.
गेली दोन महिन्यांपासून परिसरात दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र, अधिकार्यांनी अद्यापही दखल घेतली नाही. सध्या तीव— उन्हाळा सुरू असून दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती न केल्यास रहिवाशांना आंदोलन करावे लागेल.
- विशाल वाळके, रहिवाशी, सातववाडी
दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. दररोज जलवाहिनी स्वच्छ करूनच पाणीपुरवठा केला जात आहे. जलवाहिनी एखाद्या चेंबरजवळ तुटली असण्याची शक्यता असून, गळतीचा शोध घेतला जात आहे. या जलवाहिनीची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल.
- तेजस्विनी बागुल, कनिष्ठ अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग