पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी टीईटी परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन, यावरून संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून, यंदा परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकार्यांनी दिली आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.