

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता पुन्हा चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. परिणामी कोल्हापूर महापालिकेतही चार नगरसेवकांचा एक प्रभाग होईल. कोल्हापुरातील लोकसंख्येनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 81 आहे. प्रत्येकी 4 नगरसेवकांचा एक याप्रमाणे 20 प्रभाग होतील. उर्वरित एका नगरसेवकासाठी स्वतंत्र प्रभागाऐवजी पाच नगरसेवकांचा एक प्रभाग करण्यात येईल.
20 ते 22 हजार मतदारांचा एक प्रभाग
कोल्हापूर शहराची लोकसंख्या सुमारे सहा लाख आहे. त्यात सुमारे चार ते साडेचार लाख मतदारांची संख्या आहे. चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार असल्याने साधारणत: 20 ते 22 हजार मतदारांचा एक प्रभाग असेल. परिणामी पक्षीय पातळीवरच निवडणूक होईल. त्यात प्रस्थापितांनाच विजयाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सामान्य इच्छुकांना निवडून येण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. पूर्वी एक प्रभाग रचना असताना चार-पाच हजार मतदारांपर्यंत पोहोचावे लागत होते. आता चार नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने तेवढ्या मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्या तुलनेत खर्चही वाढणार आहे.
कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डिसेंबर 2020 पासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी एक सदस्य प्रभाग रचना आणि 81 नगरसेवक संख्या यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार याद्या जाहीर करणे आदी कामे पूर्ण झाली होती. मात्र, मार्च 2021 मध्ये कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली.
महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिकेला दिले. 7 ऑक्टोबर 2021 ला कोल्हापूर शहरातील 81 प्रभागांसाठी प्रत्येकी 3 नगरसेवकांचा एक असे 27 प्रभाग निश्चित करण्यात आले. प्रभाग रचना जाहीर करून आरक्षण सोडतही काढण्यात आली. परंतु, पुन्हा निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारने 2011 नंतर जनगणना झाली नसल्याने अंदाजित लोकसंख्या गृहीत धरून सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबर 2021 रोजी अध्यादेश काढला. त्यानुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 92 करण्यात आली. तसेच बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 वॉर्ड आणि 2 नगरसेवकांचा एक असे 31 वॉर्ड करण्यात आले. यानुसार प्रभाग रचना निश्चित करून आरक्षण सोडत काढून मतदारयाद्या जाहीर केल्या आहेत. त्यासंदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला त्याचवेळी पाठवला आहे. मात्र, आता चार नगरसेवकांचा एक प्रभाग करावा लागणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया बदलावी लागेल.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. एप्रिल-मेमध्ये या निवडणुका होतील. त्यानंतर पावसाळा सुरू होईल. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी माजेल. या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून निवडणुकीसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका होऊन राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणांगण माजण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.