

पुणे : तोतया वकील स्नेहल कांबळेविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कांबळेने वकील असल्याची बतावणी करून आतापर्यंत तिघांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तिच्याविरुद्ध फसवणुकीचे आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे
वकील असल्याची बतावणी करून मुलाला घटस्फोट मिळवून देते, असे आमिष दाखवून कांबळेने एका ज्येष्ठ महिलेची पाच लाख 30 हजारांची फसवणूक केली. याबाबत संबंधित ज्येष्ठ महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली. कांबळेविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. कांबळे सध्या पोलिस कोठडीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल कांबळेने ज्येष्ठ महिलेकडे वकील असल्याची बतावणी केली. महिलेचा मुलगा आणि सुनेमध्ये वाद सुरू होते. घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ज्येष्ठ महिलेकडून कांबळेने वेळोवेळी रोख स्वरूपात पैसे घेतले. अटकेची भीती दाखविली, तसेच पोलिसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून पैसे उकळले. कांबळेने महिलेची पाच लाख 30 हजारांची फसवणूक केली. कांबळेविरुद्ध फसवणूक, तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कांबळेने एका व्यक्तीला जाळ्यात ओढले होते. सुनेपासून सोडचिठ्ठी मिळवून देते, असे आमिष दाखवून पाच लाख 94 हजार रुपये घेतले होते. दुसर्या प्रकरणात महिलेच्या विवाहित मुलीला न्याय मिळवून देते, पतीच्या ताब्यातून मुलगा मिळवून देते, असे सांगून एक लाख 30 हजार रुपये उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
आरोपी स्नेहल कांबळेने वकील असल्याची बतावणी करून अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटस्फोट, चोरी, बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवून तिने तक्रारदारांकडून पैसे उकळले आहेत. तिच्याविरुद्ध तक्रार असल्यास तक्रारदारांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.