प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : शहराच्या सुमारे 60 लाख लोकसंख्येसाठी 15 ते 20 टक्के लोकसंख्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेते. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्या 5 ते 10 लाख लोकसंख्येसाठी केवळ एकच अतिदक्षता विभाग आहे. कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयू पीपीपी तत्त्वावर चालविला जात असल्याने मोफत उपचार मिळत नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ससून रुग्णालयात पाठविले जाते. याबाबत विचारणा केली असता, तृतीयक सेवा देणे महापालिकेला बंधनकारक नाही, असे अजब उत्तर आरोग्य विभागाकडून देण्यात आले.
सध्या पुणे महापालिकेच्या अखत्यारीत कमला नेहरू रुग्णालय, डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयासह 19 दवाखाने आहेत. बहुतेक रुग्णालयांमध्ये प्रसूती कक्ष, ऑपरेशन थिएटर इत्यादी सुविधा कार्यरत आहेत. मात्र, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारी अतिदक्षता सुविधा केवळ कमला नेहरूमध्येच उपलब्ध आहे. या ठिकाणी केवळ 15 आयसीयू खाटांची क्षमता असून एका दिवसासाठी तीन हजार ते चार हजार रुपये शुल्क आकारले जाते. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्यात आला. खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयूमध्ये एका रुग्णाला एका दिवसाला 8 ते 10 हजार रुपये खर्च येऊ शकतो.
रुग्णांकडून केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेपेक्षा एक टक्का कमी दराने शुल्क आकारले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, सध्याचे दरपत्रक पाहता एका रुग्णाला चार ते पाच हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो. शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्येही चढे दर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सीजीएचएस योजनेतील दरांनुसार आयसीयूमधील उपचारांचे दर आकारण्याच्या द़ृष्टीने महापालिकेने खासगी एजन्सीशी करार केला आहे. आयसीयूमध्ये 15 आयसीयू बेड आणि 10 व्हेंटिलेटर आहेत. सध्या प्रत्येक शिफ्टमध्ये एक इंटेन्सिव्हिस्ट, दोन नर्स आणि तीन हाउसकीपिंग कर्मचारी रुजू करण्यात आले असून, तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करीत आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अंदाजपत्रक दरवर्षी वाढत असले तरी त्यामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी फारच कमी निधी दिला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, एक लाख लोकसंख्येसाठी किमान पाच आयसीयू बेड्स असावेत. त्यानुसार पुण्यात महापालिकेकडे किमान 200 आयसीयू बेड्स असणे आवश्यक आहे.
कोरोना महामारीच्या काळात महापालिकेने अनेक तात्पुरते आयसीयू आणि व्हेंटिलेटर सुविधा उभारल्या होत्या. मात्र, महामारी संपल्यानंतर त्या सुविधा मोडीत काढल्या गेल्या किंवा खासगी संस्थांच्या ताब्यात गेल्या. त्या पायाभूत सुविधांचा सातत्यपूर्ण उपयोग केला असता, तर गरजू रुग्णांना लाभ मिळू शकला असता, अशी चर्चा आहे.
महापालिकेला स्वत: अतिदक्षता विभाग चालवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासते. शासनातर्फे मंजूर मर्यादित वेतनश्रेणीवर स्पेशालिस्ट डॉक्टर काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे जाहिराती देऊनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पीपीपी तत्त्वावर आयसीयू सुरू केले आहे. यामध्ये शासकीय दराने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
डॉ. निना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
महापालिका रुग्णालयांमधील द्वितीय आणि तृतीयक सेवांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण ससून रुग्णालयात पाठवले जातात. ससून रुग्णालयात एकूण 1296 खाटा असून अतिदक्षता विभागात 180 खाटा आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून रुग्ण येत असल्याने आयसीयूमध्ये कायम ’वेटिंग’ असते. महापालिका रुग्णालयांनी प्राथमिक आणि द्वितीय आरोग्य सेवा योग्य पद्धतीने दिल्यास ससूनमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सुविधा देता येतील.
डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय