

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील पूर्णानगर येथे एका हार्डवेअरच्या दुकानास आग लागून चार जणांचा दुर्देवी अंत झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शहरातील धोकादायक दुकानांचे सर्वेक्षण करणे आवश्यक होते. मात्र, मनुष्यबळ नसल्याचे कारण देत प्रशासनाने अद्याप सर्वेक्षणाचे कामच सुरू केलेलेे नाही.
पूर्णानगर येथील दुकानास आग लागून पोटमाळ्यावर राहणारे दुकानदार व त्यांच्या कुटुंबीयांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना 30 ऑगस्ट रोजी घडली होती. त्या प्रकारामुळे संपूर्ण शहर सुन्न झाले होते. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच, दुकानातच राहण्यास असलेले दुकानदार व व्यावसायिकांच्या गाळ्याचे सर्वेक्षण केले जाईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी स्पष्ट केले होते.
मात्र, 25 दिवस होत आले तरी, अद्याप पालिकेच्या अग्निशमन विभागाने धोकादायक दुकानांचे सर्वेक्षण केलेले नाही. कामाच्या ठिकाणीच अनेक कामगार तसेच, दुकानदार राहतात. अशा ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यानंतर वित्त व जीवित हानी होते. त्यामुळे दुकान, हॉटेल, बेकरी, पंक्चर, गॅरेज, खाद्यपदार्थाचे स्टॉल, वर्कशॉप आदी ठिकाणी कामगार तेथेच राहतात. त्यामुळे जीवितहानी होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. महापालिकेने अद्याप सर्वेक्षण सुरू न केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पुन्हा अशा घटनांची वाट महापालिका प्रशासन पाहत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 7 लाख मिळकती आहेत. त्यात निवासी, बिगरनिवासी व औद्योगिक अशा मिळकती आहेत. महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे 6 लाख मिळकतीची नोंद आहे. शहरात 5 लाख 50 हजारांपेक्षा अधिक निवासी मिळकती आहेत. तर, सुमारे 70 हजार बिगरनिवासी मिळकती आहेत. सुमारे 5 हजार औद्योगिक मिळकती आहेत. 25 हजार मिश्र मिळकती आहेत. शहरातील बिगरनिवासी मिळकतींचे सर्वेक्षण महापालिकेस करावे लागणार आहे.
दुकाने व आस्थापना येथे धोकादायकरित्या राहत असलेल्या ठिकाणचे महापालिकेकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. या प्रकाराच्या गाळ्याचा शोध घेण्यात येणार आहे. त्या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली. सर्वेक्षण ऑनलाईन अॅपवर केले जाणार आहे. त्यासाठीची माहिती जमा केली जात आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले जाईल. त्यासाठी मनुष्यबळही नेमले जाणार आहे, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा