सिंहगड रस्ता गेला खड्ड्यात ! वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची दैना

सिंहगड रस्ता गेला खड्ड्यात ! वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची दैना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उड्डाणपुलाच्या कामासाठी उभारलेले बॅरिकेट्स, रस्त्यांवर पडलेले मोठ-मोठे खड्डे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली अतिक्रमणे, पथारी व्यावसायिक, व्यापार्‍यांकडून रस्त्याच्या कडेला पार्क केली जाणारी वाहने या सर्व गोष्टींमुळे सिंहगड रस्त्याची पुरती दैना झाली आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल चौक ते फन टाईम थिएटर यादरम्यान अडीच किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे.

या उड्डाणपुलाचे काम 21 सप्टेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आले असून, 71 पिलर्स आणि 106 गर्डर असलेल्या या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत चार महिन्यांची आहे. आतापर्यंत गोयलगंगा चौक ते विठ्ठलवाडी चौक यादरम्यान पिलरचे काम पूर्ण झाले असून, आता त्यावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच राजाराम पूल चौकातही काम सुरू आहे. दरम्यान, उड्डाणपुलाचे काम अपेक्षित गतीपेक्षा जास्त वेगाने सुरू असल्याने उड्डाणपुलाचे जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर 2025 पर्यंत उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील काही दिवस शहरात सुरू असलेल्या पावसामुळे सिंहगड रस्त्यावर आनंदनगर ते फन टाईम थिएटर या दरम्यान दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांमध्ये वाहने आदळत आहेत. दुसरीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण वाढले आहे. त्यातच व्यापार्‍यांकडून रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केली जातात. त्यामुळे राजाराम पूल ते वडगाव या दरम्यान रस्त्याची वाट लागलेली आहे. यामुळे या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस दिवसभर वाहतूक कोंडी होते.फ

पर्यायी रस्त्यावरही होते कोंडी
सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीस पर्याय म्हणून कालव्याच्या बाजूने फन टाईम थिएटर ते जनता वसाहत यादरम्यान रस्ता करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने विठ्ठलवाडी ते फन टाईम या दरम्यान पर्यायी रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वाहनचालक वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर लंडन पूल चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने दोन्ही बाजूस फायबरचे डिव्हायडर उभारले आहेत. मात्र, अनेकजण त्यातही उलट्या दिशेने वाहने घालतात, त्यामुळे वारंवार वाद होतात. परिणामी, वाहतूक कोंडीत भरच पडत आहे.

केवळ घोषणाच, कार्यवाही शून्य
महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर नो पार्किंग, नो हॉल्टिंगच्या धोरणाची घोषणा करण्यात आली; मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीला कोणतीच सुरुवात झालेली नाही. या घोषणेनंतर काही प्रमाणात खड्डे दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. इतर सर्व स्थिती 'जैसे थे'च आहे. त्यामुळे मालमत्ता विभागासह, विकास आराखड्यातील या रस्त्यावरील रेखांकन करून प्रथम साईड मार्किंग केले जाणार आहे. विविध खात्यांची एकत्रित अशी ही कारवाई असल्याने, या सर्व खात्यांमध्ये सांगड घालून सिंहगड रस्ता आदर्श रस्ता बनविण्यासाठीचा मुहूर्त गाठावा लागणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news