ऑगस्टसाठी साखरेचा 23.50 लाख टन कोटा

ऑगस्टसाठी साखरेचा 23.50 लाख टन कोटा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारने ऑगस्टसाठी 23 लाख 50 हजार टन इतका साखरेचा कोटा जाहीर केलेला आहे. तसेच,
जुलै महिन्याच्या 24 लाख टन कोट्यातील शिल्लक साखर विक्रीस  15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. असे असले तरी उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे ऊस उत्पादनात काहीशी घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, आगामी सणासुदीच्या दिवसांमुळे साखरेला मागणी चांगली राहून दरपातळी स्थिरावण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्यात श्रावण महिना, राखी पौर्णिमा असून, श्रावणापासून सणासुदीची मागणी सुरू होत असते. त्यामुळे साखरेचा मुबलक कोटा असला तरी दरावर कोणताही परिणाम न होता ते तेजीत स्थिरावण्याचा अंदाज व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे.
सध्या साखर कारखान्यांकडील निविदा क्विंटलला 3,480 ते 3,520 रुपयांपर्यंत जात आहेत. तर, बाजारपेठेत एस 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर 3,800 रुपये आहे. कोटा मुबलक असला तरी साखरेला राहणारी मागणी लक्षात घेता दरावर तूर्तास कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, किरकोळ बाजारात साखरेची विक्री प्रतिकिलोस 38 ते 40 रुपये दराने होत आहे. सुमारे 125 साखर कारखान्यांकडून उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम देण्यामुळे कारखान्यांकडूनही गरजेइतकीच साखर विक्री करण्याचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे साखर विक्री कमी होणे आणि सणासुदीमुळे मागणी चांगली राहण्याच्या अपेक्षेमुळे दर उंचच राहण्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तविला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news