

पुणे: परवानगी न घेता महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींसाठी बेकायदेशीररीत्या वीज जोड घेतल्याप्रकरणी महावितरणने महापालिकेला 4 लाख 14 हजार 500 रुपयाुचा दंड ठोठावला आहे.
हे बेकायदा वीजजोड तब्ब्ल सात वर्षांपासून घेण्यात आल्याचे उघड झाले असताना देखील महावितरणने पालिकेला केवळ एका वर्षाचा दंड लावल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी तसेच हा दंड संबंधित अधिकार्यांच्या खिशातून वसूल करावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. (Latest Pune News)
महाविकास आघाडीमार्फत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख अक्षय जैन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. मदन कोठुळे, गणेश ठोंबरे, नीलेश वाघमारे, गणेश घोलप यांनी याप्रकरणी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागवली होती. यात वीजचोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वीजचोरी 7 वर्षांपासून दंड मात्र केवळ केवळ एका वर्षांचा माहितीचा अधिकारात या बाबत माहिती विचारण्यात आल्यावर महापालिकेच्या शिक्षण विभागाने पाहणी केली. यात सात एसी आढळले. मात्र, महावितरणने केलेल्या पाहणी व अहवालातून हे एसी गायब करण्यात आले आहेत.
या बाबत सागर धाडवे म्हणाले, आम्ही माहिती अधिकारामध्ये माहिती मागवत विचारलेल्या प्रश्नावर महापालिकेच्या शिक्षण विभागाने व मालमत्ता विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे की, येथे व्यायामशाळा व अभ्यासिका चालवण्यास कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, गेल्या 7 वर्षांपासून हा प्रकार सुरू असतांना तो लपून कसा काय राहिला?
अक्षय जैन म्हणाले, हा प्रकार केवळ वीजचोरीपुरता मर्यादित नाही, हा पुणेकरांच्या कराच्या पैशांचा अपहार आहे. महापालिकेच्या अधिकार्यांनी आणि सत्ताधार्यांनी याला संरक्षण दिल्याने ही बाब सात वर्षे दडून राहिली असून या प्रकरणाचा सखोल तपास आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. अनंत घरत म्हणाले, महापालिका व महावितरण या दोन्ही सरकारी यंत्रणा आहेत. त्यांनीच जर नागरिकांना लुटण्याचे काम केले, तर सर्वसामान्य माणूस न्याय कुठे मागणार?