पुणे: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासह बालगंधर्व नाट्यगृहात पेस्ट कंट्रोल... नाट्यगृहांची संपूर्ण स्वच्छता....उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी नाट्यगृहात बसविण्यात आलेले पिंजरे अन् नाट्यगृहाच्या आत प्रेक्षकांना खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मनाई....अशा विविध उपाययोजना महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने नाट्यगृहांमध्ये करण्यात येत आहेत.
आता पालिकेच्या सर्व नाट्यगृहांमध्ये टप्प्याटप्प्याने पेस्ट कंट्रोल करण्यात येणार असून, नाट्यगृहांमध्ये जे प्रेक्षक स्वच्छता राखणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. (Latest Pune News)
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी (दि. 31) रात्री नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका महिला प्रेक्षकाला उंदराने चावा घेतला आणि गोंधळ उडाला. त्यामुळे महापालिकेच्या नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सांस्कृतिक विभागामार्फत विद्युत विभाग, भवन विभागासह कलाकार आणि नाट्य व्यवस्थापकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात नाट्यगृहांमधील समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा झाली. त्यानंतर आता प्रशासनाकडूनही ठोस पावले उचलण्यात येत आहेत. सांस्कृतिक विभागाकडून नाट्यगृहांमध्ये पेस्ट कंट्रोल आणि स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.
याविषयी महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पेस्ट कंट्रोल करण्यात आले आहे. संपूर्ण नाट्यगृहात डीप क्लीन करण्यात आले आहे. नाटक सुरू होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या आत खाद्यपदार्थ आणू नयेत, अशा सूचना कलाकारांमार्फत प्रेक्षकांना देणे सुरू केले आहे.
नाट्यगृहात स्वच्छता न राखणार्या प्रेक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. उंदरांचा उपद्रव थांबवण्यासाठी नाट्यगृहात पिंजरे बसविले आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिरासह आता सर्वच नाट्यगृहांमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात येणार आहे.
हलगर्जीपणा केल्यास कर्मचार्यांवर कारवाई
सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत येणार्या सर्व नाट्यगृहांचे अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक यांच्यासमवेत उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी बैठक घेतली. यापुढे कोणत्याही नाट्यगृहात कोणतीही समस्या येणार नाही, यासाठी सर्वांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कोणीही कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे कामठे यांनी सांगितले.