पुणे: पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठून किंवा खड्डे पडून नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी दरवर्षी महापालिकेमार्फत पावसाळा पूर्व कामे हाती घेतली जातात. ही कामे पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण होणे अपेक्षित असते. तशी मुदतही पालिकेमार्फत ठेकेदारांना दिली जाते.
या वर्षीदेखील 7 जून पर्यंत रस्ते दुरुस्ती आणि ड्रेनेजसह नालेसफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ही तारीख उलटूनही कामे रखडल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. याबाबत अधिकार्यांना माहिती विचारली असता समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. (Latest Pune News)
पुण्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचुन पुरस्थिती निर्माण होते. त्यामूळे महानगर पालिकेच्या पथ विभाग आणि ड्रेनेज विभागामार्फत रस्ते दुरुस्ती आणि ड्रेनेजसह नालेसफाईची कामे केली जातात.
याच्या निविदा देखील काढल्या जातात. या साठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. ही कामे पाऊस सुरू होण्या पूर्वी पूर्ण करण्यासाठी मुदत देखील दिली जाते. या वर्षी देखील पावसाळी पूर्व कामे करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. ही कामे पूर्ण करण्यासाठी 7 जून ही मुदत देण्यात आली होती.
एप्रिल महिन्यापासून पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र, एप्रिल, मे उलटून अर्धा जून महिना संपत आला असतांना देखील अद्याप रस्ते दुरुस्ती आणि ड्रेनेजसह नाले सफाईची कामे रखडली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरन सुरू आहे. तर, काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची कामे सुरू आहेत. पावसाळी वाहिन्या टाकण्यासाठी तसेच ड्रेनेजच्या कामासाठी काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या बाबत अधिकार्यांना विचारले असता, संबंधित ठेकेदारांना विचारून मुदत ठरवण्यात आली होती. तसेच गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक कामे पूर्ण करता आले नाही असे उत्तर मिळाले.
या अपूर्ण कामाचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. या कामामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे. दरम्यान, अपूर्ण राहिलेली कामे पुढील काही दिवसांत प्राधान्याने पूर्ण केली जाईल, अशी माहिती महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
भर पावसात टिळक रस्त्यावर डांबरीकरण
पुण्यात बुधवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसात काही भागात रस्त्यावर डांबरीकरन करण्यात आले. टिळक रस्त्यावर भर पावसात हे डांबरीकरन सुरू होते. त्यामुळे या कामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्नउपस्थित केले. या बाबत पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावस्कर यांना विचारले असता त्यांनी पाऊस झाल्यावर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असे उत्तर दिले.
पावसाची विश्रांती, तरी कामे संथगतीने
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पथ विभागाकडून खड्डे दुरुस्तीची कामे वेगाने करणे आपेक्षित होते. परंतु ही कामे संथ गतीने सुरु आहेत. पाणीपुरवठा विभाग, महावितरण, ड्रेनेज लाईनची कामे अद्यापही सुरु असल्याने रस्ते खोदाई सुरु आहे, तर ज्या ठिकाणी कामे झाली आहेत, त्या रस्त्यावर डांबरीकरण झालेले नाही की खड्डे बुजवलेले नाहीत. 11 जून या एका दिवसात 149 खड्डे बुजवल्याचा दावा पथ विभागाने केला आहे. तर 32 चेंबर दुरुस्ती, पाणी साचक असलेल्या 6 ठिकाणी उपाय योजना करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.