

पुणे: येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील पाच अल्पवयीन मुलांनी मिळून 17 वर्षीय मुलाला हाताने मारहाण केली. यानंतर टॉवेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने गळा आवळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत संतोष किसन कुंभार (वय 49, रा. चर्होली फाटा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील बराक क्रमांक दोनमध्ये मंगळवारी (दि.10 जून) सकाळी सव्वानऊ वाजता घडला. गुन्हेगारीमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवले जाते. (Latest Pune News)
यातील बराक क्रमांक दोनमधील 17 वर्षांच्या मुलाने बाथरूम साफ करण्यास नकार दिला. या कारणावरून त्याचे इतर मुलांशी भांडण झाले. तेव्हा पाच अल्पवयीन मुलांनी या मुलाला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.
टॉवेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने त्याचा गळा आवळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच तेथील सुरक्षारक्षकाने या मुलाला वाचविले. येरवडा पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत.