पिंपरी : शहरातील महापालिका रुग्णालयांमध्ये सध्या विविध वैद्यकीय सुविधांची कमतरता पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे रुग्णांची मात्र हेळसांड होत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, सर्व औषधे न मिळणे, केस पेपरपासून औषधे घेण्यापर्यंत सर्व ठिकाणी लागणार्या लांबच-लांब रांगा, काही चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळा आणि दवाखान्यांची घ्यावी लागणारी मदत अशा विविध अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
महापालिकेची शहरात आठ रुग्णालये आहेत. तर, पिंपरी-अजमेरा कॉलनी येथे स्वतंत्र नेत्र रुग्णालय आहे. पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे जुने आणि प्रमुख रुग्णालय आहे. 750 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या काही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्याशिवाय, येथे विविध आजारांवरील सर्व औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकदा रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागतात. त्याशिवाय, येथील विविध वैद्यकीय सामग्री काही-ना-काही कारणास्तव बंद असतात.
त्यामध्ये प्रामुख्याने एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन यांचा उल्लेख करावा लागेल. अशा परिस्थितीत रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन आवश्यक चाचण्या करून घ्याव्या लागतात. त्यामुळे त्यासाठी त्यांचा अनाठायी खर्च होतो. त्याशिवाय, येथील रुग्णालयात नातेवाइकांना थांबण्यासाठी अद्याप पुरेशी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे नातेवाइकांची गैरसोय होत आहे.
शहरातील तळवडे येथील कारखान्यात 8 डिसेंबरला आग लागली. त्यामध्ये एकूण 14 महिला कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवावे लागले. त्यामुळे जळित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याची गरज अधोरेखित झाली. त्याबाबत महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
महापालिकेने नवीन जिजामाता रुग्णालय (पिंपरी), नवीन आकुर्डी रुग्णालय (आकुर्डी), नवीन भोसरी रुग्णालय (भोसरी), नवीन थेरगाव रुग्णालय (थेरगाव) आदी ठिकाणी रुग्णालयांची उभारणी केली. चिंचवडगाव येथे तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून तेथे नवीन तालेरा रुग्णालयाची इमारती उभी राहिली आहे. तर, पिंपरी-अजमेरा कॉलनी येथे नवीन नेत्ररुग्णालय साकारले आहे. नवीन रुग्णालये सुरु करताना महापालिका प्रशासनाने तेथे पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक वैद्यकीय सामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देणे गरजेचे होते.
मात्र, या तीनही पातळ्यांवर पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. रुग्णालयांमध्ये मानधन आणि कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय व अन्य कर्मचारी घेतलेले आहेत. त्याशिवाय, तज्ज्ञ डॉक्टरदेखील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तत्त्वावर घेतले जात आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अडचण ही मनुष्यबळाची जाणवत आहे.
महापालिकेची 29 दवाखाने आहेत. त्यातील बहुतांश दवाखान्यांमध्ये केवळ बाह्यरुग्ण विभाग आहेत. काही ठिकाणी गर्भवती महिलांसाठी आंतररुग्ण विभागाची सोय आहे. मात्र, अन्य विविध मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना महापालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. त्यामुळे महापालिकेचे दवाखाने हे सध्या केवळ प्राथमिक उपचारापुरतेच मर्यादित राहत आहेत.
कर्करोगावरील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचीदेखील सध्या गरज आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. थेरगाव येथे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी तत्त्वावर) हे रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. गेल्या पाच वर्षांपासून कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, अद्याप त्याला मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यान, रुग्णालयांतील वैद्यकीय सुविधांबाबत महापालिका प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याशी संपर्क साधला, असता ते उपलब्ध झाले नाहीत.
हेही वाचा